गोोंदिया:गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कवलेवाडा अंतर्गत येणाऱ्या बोरगाव येथे दूषित पाण्यामुळे अतिसार आणि जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव झाला आहे. गावात एकूण २३ रुग्ण आढळले असून, या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने तातडीने गावात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
२३ पैकी २२ रुग्णांना डिस्चार्ज, परिस्थिती नियंत्रणात
प्रादुर्भाव झालेल्या २३ रुग्णांपैकी २२ जणांवर कवलेवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाह्यरुग्ण विभागात (OPD) उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे. उर्वरित एका रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या गावातील साथ आटोक्यात असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची गावात धाव
साथरोगाची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) डॉ. अभिजित गोल्हार, गट विकास अधिकारी (BDO) श्री. धोटे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल आणि गोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी (THO) डॉ. विनोद चव्हाण यांनी संपूर्ण वैद्यकीय व प्रशासकीय पथकासह बोरगावला अचानक भेट दिली. अधिकाऱ्यांनी गावात फिरून रुग्णांची विचारपूस केली आणि स्वच्छतेच्या अभावाबद्दल स्थानिक आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायतीला कडक शब्दांत निर्देश दिले.
घरोघरी सर्वेक्षण अन् आरोग्य शिबिर
-
आरोग्य छावणी: बोरगावात पुढील सात दिवस विशेष आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले असून डॉ. प्रियंका हेडाऊ व डॉ. आचल यांच्या देखरेखीखाली रुग्णांवर मोफत औषधोपचार सुरू आहेत.
-
सर्वेक्षण: आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध व सर्वेक्षण घेतले जात आहे. साथ पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत आरोग्य पथक गावातच तळ ठोकून राहणार आहे.
-
औषध वाटप: बाधित परिसरात मेडिक्लोर व आवश्यक औषधांचे वाटप तातडीने सुरू करण्यात आले आहे.
शुद्ध पाणी आणि स्वच्छतेबाबत कडक सूचना
गट विकास अधिकारी श्री. धोटे व आरोग्य विस्तार अधिकारी श्री. पटले यांनी गावातील स्वच्छतेची पाहणी करून ग्रामपंचायतीला तातडीने नाल्या उपसण्याचे व स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेश दिले.
-
पिण्याच्या नळ योजनेचे आणि पाण्याच्या स्रोतांचे दररोज ‘टीसीएल’ (TCL) पावडर टाकून शुद्धीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
-
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा, पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन डॉ. गोल्हार यांनी केले आहे.
या पाहणी दौऱ्यात सरपंच मनीषा चोपकर, आरोग्य विस्तार अधिकारी श्री. पटले, डॉ. प्रियंका हेडाऊ, डॉ. आचल यांच्यासह स्थानिक ग्राम अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





