नागपूर, दि. 7 सप्टेंबर 2026: वीज ग्राहकांना पारदर्शक आणि अचूक बिलिंगचा लाभ मिळवून देण्यासाठी महावितरणतर्फे अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवण्याचे काम वेगाने सुरू असतानाच, बुटीबोरी उपविभागांतर्गत खापरी शाखा कार्यालयाच्या हद्दीत महावितरणने धडक कारवाई करत थेट ‘सर्व्हिस वायर बायपास’ करून विजेचा अपहार करणारी तब्बल 14 प्रकरणे एकाच दिवशी पकडण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे, या सर्व 14 ग्राहकांच्या आवारात हायटेक स्मार्ट मीटर आधीपासूनच बसवण्यात आले होते. तरीही ग्राहकांनी तांत्रिक प्रणालीत थेट हस्तक्षेप न करता, मुख्य वीज वाहिनीवरून (Incoming Cable) वायर बायपास करून स्मार्ट मीटरलाच चकवा देण्याचा प्रयत्न केला. यामुळे विजेचा वापर बेधडक सुरू होता, मात्र मीटरमध्ये एकही युनिट नोंदवला जात नव्हता.
महावितरणच्या अधिकारी व कर्मचा-यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून पकडलेल्या सर्व 14 प्रकरणांमधील चोरीच्या विजेचे मूल्यमापन आणि दंड आकारणी (Assessment) करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. दोषी आढळलेल्या ग्राहकांवर वीज कायदा, 2003 च्या कलम 135 अन्वये कडक फौजदारी आणि दंडात्मक कारवाईची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे. या यशस्वी कारवाईनंतर संपूर्ण नागपूर परिमंडळातील औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी क्षेत्रांत तपासणी मोहीम अधिक आक्रमक करण्यात आली आहे. तर शांतीनगर परिसरात देखील 4 वीजचो-या उघडकीस आल्या आहेत. याशिवाय भुतिया अरवाजा, गांधीबाग, गौंडखैरी, भिवापूर. चापेगडी, सालवा, गोवरी येथे प्रत्येकी 1, खापा येथे 2 वीजचो-या उघडकीस आल्या आहेत
महावितरणने वीजचोरीच्या विरोधात पूर्णपणे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले असून, भरारी पथके आणि स्थानिक अधिकाऱ्यांना वीजचोरी शोधण्यासाठी विशेष उद्दिष्टे देण्यात आली आहेत. सध्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या जोडण्यांवरही कडक नजर ठेवली जात आहे. बेकायदेशीर वीज वापरामुळे शॉर्टसर्किट, ट्रान्सफॉर्मरमधील बिघाड आणि आगीसारख्या जीवघेण्या दुर्घटना घडून महावितरणचे व नागरिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे संपूर्ण वितरण व्यवस्थेत सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी महावितरण कटिबद्ध आहे. महावितरणचे प्रत्येक जोडणीवर बारीक लक्ष असून, नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता केवळ अधिकृत विजेचाच वापर करावा, असे सडेतोड आवाहन महावितरणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे.





