30.9 C
Gondiā
Tuesday, September 8, 2026
Home विदर्भ खांबी-सिरेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करा; जि.प. सदस्य रचनाताई गहाणे यांचे...

खांबी-सिरेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करा; जि.प. सदस्य रचनाताई गहाणे यांचे अध्यक्षांना निवेदन

0
62

३० गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर; नागरिक आंदोलनाच्या तयारीत

अर्जुनी मोरगाव:अर्जुनी-मोर तालुक्यातील खांबी व सिरेगाव बांध येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या सप्टेंबर महिन्यापासून बंद पडल्याने तब्बल ३० गावांतील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ही योजना तातडीने सुरू करून नागरिकांना नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे यांनी गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

३० गावांत पाण्याची तीव्र टंचाई

या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत अर्जुनी-मोर तालुक्यातील ३० महत्त्वाच्या गावांचा समावेश आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून ही योजना ठप्प असल्यामुळे हजारो ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. दैनंदिन जीवनावर याचा विपरीत परिणाम झाला असून, संतप्त नागरिक आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त करत आहेत.

आंदोलनाचा इशारा

पाणी हा मूलभूत हक्क असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. हा प्रश्न प्रशासनाने तातडीने सोडवला नाही, तर ३० गावांतील नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा रचनाताई गहाणे यांनी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिला.

प्रशासनाकडून त्वरित कार्यवाहीची अपेक्षा

जनतेच्या आरोग्याशी आणि थेट जगण्याशी जोडलेला हा प्रश्न गांभीर्याने घेत, जिल्हा परिषद अध्यक्षांनी आपल्या स्तरावर तात्काळ योग्य निर्णय घ्यावा व बंद पडलेली योजना पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागाला द्यावेत, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावर जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर काय पावले उचलतात, याकडे ३० गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.