गोंदिया -पोळ्याच्या सणाचा आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दाम्पत्याच्या सुखावर काळाने घाला घातला. देवरी शहरातील तहसील कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला. ज्योती रुपेश दरों (वय २४) असे मृत महिलेचे नाव असून रुपेश कन्हैयालाल दरो (वय २९) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही दर्रोटोला/भरेगाव, ता. देवरी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. या घटनेने दर्रीटोला व भरेगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोळा सणानिमित्त रुपेश दरों हे पत्नी ज्योती यांच्यासह दुचाकी क्रमांक एमएच ३५ एवाय १४०९ ने बाहेरगावी जाण्यासाठी निघाले होते. देवरी शहरातील तहसील कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्गावरून ते पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपाच्या दिशेने जात असताना समोरून आलेल्या सीजी ०७ बीए ३०६७क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात ज्योती दरों यांची घटनास्थळीच मृत्यू झाला. तर रुपेश दरों हे गंभीर जखमी झाले. सणाच्या आनंदासाठी निघालेल्या दाम्पत्यापैकी पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





