बसपचे माजी प्रदेशाध्यक्ष, बहुजन नेते डॉ.अॅड.संदीप ताजने यांचे आवाहन
जरांगे यांच्या दबावाच्या राजकारणाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांनी स्वतःला आंबेडकरी विचारांचे पाईक म्हणून घेऊ नये, असा घणाघातही डॉ.अॅड.ताजने यांनी केला. आरक्षणासाठी उपोषणाचे हत्यार उपसत सरकारला ब्लॅकमेल करीत जरांगे स्वत:ला आरक्षणाचा नवा शिल्पकार घोषित करणार आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जे मानत नाही, या महापुरूषांचे साधे फोटो देखील त्यांच्या मंचावर, व्यासपीठावर चालत नाही त्यांना आरक्षण मागण्याचा अधिकार आहे काय? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
जरांगे यांनी मुंबईत जेव्हा पहिल्यांदा आंदोलन केले होते तेव्हा त्यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तत्काळ मंचावरून हटवला होता, याची आठवण देखील डॉ.अॅड.ताजने यांनी यानिमित्ताने करून दिली. जरांगे संविधानापेक्षा मोठे नाही. महाराष्ट्रात सर्वाधिक मोठ्या संख्येने असलेल्या मराठा समाजाच्या हो मध्ये सरकार हो मिसळत असेल तर त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिले तर ओबीसी बांधवांवर अन्याय ठरेल. अर्थात ज्यांचे माणुसपण हिरावून घेतले, वर्षांनूवर्ष ज्यांच्या गळ्यात मडके होते, ज्यांनी कधी सामाजिक-आर्थिक समानता अनुभवली नाही, ज्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आली त्यांच्यासाठी आरक्षणाची गरज असून त्याअनुषंगाने व्यवस्था करण्यात आली आहे. केवळ राजकारणासाठी आरक्षणाचा फायदा घेवू नका, असे आवाहन डॉ.अॅड.ताजने यांनी केले.
मराठा समाज विदर्भात कुणबी, मराठवाड्यात मराठा आणि पश्चिम महाराष्ट्रात राजे म्हणून वावरतो. आरक्षणासाठी त्यांना कुणबी प्रमाणपत्र हवे असते, राजकारण करतांना ते मराठा होतात आणि मानसन्मानाच्या वेळी त्यांना देशमुख म्हणून मिरवून घ्यायचे असते.अशात जरांगे यांनी जिभेला आवर घालावा आणि सर्वसामान्यांना वेठीस धरू नये, असे डॉ.अॅड.ताजने म्हणाले.राजकीय स्वार्थासाठी किंवा दबावाचे राजकारण करण्यासाठी उत्सव काळाची निवड करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि कायदा-सुव्यवस्थेला घातक आहे. जनतेच्या भावनांचा गैरवापर करून सरकारवर दबाव आणण्याचे हे तंत्र तातडीने थांबवले पाहिजे. राज्यात शांतता, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,असे डॉ.अॅड.संदीप ताजने म्हणाले.
…





