गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष एकत्र येणार असल्याच्या केवळ चर्चा आहेत. भाजप व अजित पवार पक्षातील काहीजण पसरवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. शरद पवार यांनी सुद्धा ही चर्चा निष्फळ असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने भाजपची साथ सोडली तरच विलनीकरणाची चर्चा होणे शक्य असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आ. रोहित पवार यांनी मंगळवारी (दि. ८) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.आ. रोहित पवार हे मंगळवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसह संवाद साधला. यावेळी माजी आ. सुनील भुसारा, सलील देशमुख, रविकांत बोपचे, मेघा बिसेन आदी उपस्थित होते.
आ. रोहित पवार दोन्ही पक्षाच्या विलनीकरणाची चर्चा आणि विसर्जित झाली आहे. त्यामुळे यावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एमपीएससी अध्यक्षांवरुन निशाणा साधला. एमपीएससीचे विद्यमान अध्यक्ष हे परिवहन आयुक्त असताना त्यांच्याविरुध्द भ्रष्टाचाराची तक्रार करण्यात आली आहे. अशा अनेक तक्रारी त्यांच्याविरुध्द त्या पुराव्यासह एक एक मी पुढे आणणार आहे. एमपीएससी अध्यक्षपदी अशा व्यक्तीला ठेवून सरकारने विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ करु नये,मुख्यमंत्र्यांना त्यांची मैत्री जपायची असेल तर त्यांनी एमपीएससीच्या अध्यक्षांना आमदार करुन मंत्री करावे असा सल्ला आ. रोहित पवार यांनी दिला. तसेच आपण विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे समर्थन केले म्हणून भाजपच्या सोशल मीडिया सेलने आपल्यावर टीका करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण भाजपने विद्यार्थी आंदोलनात राजकारण करुन या आंदोलनाला गालबोट लावू नये अशी टीका रोहित पवार यांनी केली.
दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणार
पूर्व विदर्भात धान उत्पादकांना बोनस, धानाला ३,५०० रुपये हमीभाव देण्यात याव्या, पीक विम्यातील जाचक अटी दूर कराव्यात तसेच कमी पाऊस झालेल्या भागात दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी पोळ्याच्या दिवशी नागपूर येथे विभागीय आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन याकडे लक्ष वेधणार असल्याचे आ.रोहित पवार यांनी सांगितले.





