26.1 C
Gondiā
Wednesday, September 16, 2026
Home विदर्भ गणेशोत्सवाचा सांस्कृतिक वारसा जागतिक पातळीवर नेण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी मंदार...

गणेशोत्सवाचा सांस्कृतिक वारसा जागतिक पातळीवर नेण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन

0
29

गोंदिया, दि.16 : महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला राज्य शासनाने 14 ऑगस्ट 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘राज्य महोत्सव’ म्हणून दर्जा दिला आहे. महाराष्ट्राच्या या गौरवशाली गणेशोत्सव परंपरेचे व्यापक दस्तऐवजीकरण करून ती जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी तसेच गणेशोत्सवाला युनेस्कोच्या वारसा दर्जासह अन्य जागतिक मानांकने मिळविण्याच्या दृष्टीने राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांना नागरिकांनी सक्रिय सहभागातून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.

सन 2026 च्या गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी घेण्यासाठी संबंधित कार्यालयांकडे अर्ज करणाऱ्या गणेश मंडळांना या शासन निर्णयाची माहिती देण्यात येणार असून, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

Bappa.org उपक्रमातून गणेशोत्सवाच्या परंपरेचे जतन

यावर्षी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील पुरातत्व संचालनालयामार्फत Bappa.org हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये, विविध परंपरा, कला, लोकसंस्कृती आणि सांस्कृतिक वारसा यांची माहिती संकलित करून त्याचे जतन करण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत महाराष्ट्रासह देशभरातील तसेच 35 हून अधिक जागतिक शहरांमध्ये साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाची परंपरा, गणेशमूर्ती स्थापना, सजावट, हस्तकला, रूढी-परंपरा, कला सादरीकरण, खाद्यसंस्कृती, आठवणी आणि छायाचित्रे आदींची माहिती नागरिकांना WhatsAppच्या माध्यमातून नोंदविता व अपलोड करता येणार आहे. नागरिकांच्या सहभागातून संकलित होणारी ही माहिती महाराष्ट्राच्या गणेशोत्सव परंपरेचे अधिकृत आणि कायमस्वरूपी सांस्कृतिक जतन तयार करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

गोंदिया जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती

गोंदिया जिल्ह्यात सन 2026 च्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा नियोजन अधिकारी डॉ.रुपेशकुमार राऊत यांची नोडल अधिकारी (9270241077) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळे, नागरिक आणि संबंधित घटकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून गोंदिया जिल्ह्यातील गणेशोत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा व सांस्कृतिक वारसा जगासमोर आणावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Bappa.org या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपल्या लाडक्या गणरायाशी संबंधित परंपरा, कला, संस्कृती, आठवणी व छायाचित्रांची माहिती नोंदवून या ऐतिहासिक उपक्रमात सहभागी व्हावे आणि महाराष्ट्राच्या समृद्ध गणेशोत्सव परंपरेच्या जागतिक दस्तऐवजीकरणात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव मंदार पत्की यांनी केले आहे.