26.1 C
Gondiā
Wednesday, September 16, 2026
Home मराठवाडा/खान्देश दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी प्रशासन,समाज अन् स्वयंसेवी संस्थांची एकजूट

दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी प्रशासन,समाज अन् स्वयंसेवी संस्थांची एकजूट

0
15
** धाराशिवमध्ये संवाद व चर्चासत्र
* १९ स्वयंसेवी संस्थांचे २८ प्रतिनिधी सहभागी
धाराशिव दि.१६ सप्टेंबर– कमी पाऊस,पाण्याची चिंता,संकटात सापडलेली शेती आणि त्यातून ग्रामीण जनजीवनासमोर उभे राहणारे प्रश्न… दुष्काळाचे हे संकट केवळ पाण्यापुरते मर्यादित नसून त्याचे परिणाम शेती,रोजगार,पर्यावरण आणि सामाजिक जीवनावरही उमटतात.त्यामुळे या संकटाचा एकजुटीने सामना करण्यासाठी प्रशासन,समाज,स्वयंसेवी संस्था आणि विद्यापीठांनी परस्पर समन्वयातून काम करण्याची गरज धाराशिव येथे आयोजित एकदिवसीय ‘दुष्काळस्थितीविषयी संवाद व चर्चासत्रा’त अधोरेखित करण्यात आली.
दुष्काळाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन आगामी काळातील उपाययोजनांबाबत कृती आराखडा ठरविण्यासाठी जल व भूमी व्यवस्थापन विभाग,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव आणि ज्ञान प्रबोधिनी केंद्र,हराळी यांच्या संयुक्त विद्यमाने या एकदिवसीय संवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.जिल्ह्यात विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या १९ स्वयंसेवी संस्थांमधील २८ प्रतिनिधींनी या चर्चासत्रात सहभाग नोंदविला.
दुष्काळामुळे निर्माण झालेल्या सद्यस्थितीचा विविध अंगांनी आढावा घेताना त्याचे शेती,पाणी, उपजीविका,पर्यावरण आणि सामाजिक जीवनावर होणारे परिणाम यावर सविस्तर चर्चा झाली.दुष्काळी परिस्थितीत प्रत्यक्ष गावपातळीवर काम करताना आलेले अनुभव सहभागी स्वयंसेवी संस्थांनी मांडले.स्थानिक पातळीवर जाणवणाऱ्या अडचणी, नागरिकांच्या गरजा आणि त्यावर करता येऊ शकणाऱ्या संभाव्य उपाययोजनांवरही यावेळी विचारमंथन झाले.त्यामुळे चर्चासत्र केवळ समस्यांच्या मांडणीपुरते मर्यादित न राहता संभाव्य उपायांचा शोध घेणारे व्यासपीठ ठरले.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी ऑनलाइन माध्यमातून चर्चासत्राला मार्गदर्शन केले.
धाराशिव तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शासकीय यंत्रणेच्या अभ्यासातून समोर आलेल्या दुष्काळस्थितीची माहिती दिली.आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या उपाययोजना तसेच अशा परिस्थितीत प्रशासनाची भूमिका याबाबत त्यांनी उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधला.
दुष्काळासारख्या व्यापक संकटाचा मुकाबला केवळ एका संस्था किंवा एका शासकीय यंत्रणेच्या प्रयत्नांतून होऊ शकत नाही. त्यासाठी समाज,स्वयंसेवी संस्था, विद्यापीठे आणि शासकीय यंत्रणा यांनी परस्पर समन्वय राखून एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे,हा महत्त्वाचा सूर चर्चेतून पुढे आला.शासनाच्या उपाययोजनांसोबत स्थानिक अनुभव,स्वयंसेवी संस्थांचे गावपातळीवरील काम आणि विद्यापीठांमधील अभ्यास व संशोधन यांची सांगड घातल्यास दुष्काळाच्या परिणामांना अधिक प्रभावीपणे सामोरे जाता येईल, यावर चर्चा झाली.
या संवादातून पुढील काळात स्थानिक गरजांवर आधारित उपाययोजना,उपक्रम आणि कृती आराखडे विकसित करण्यासाठी अशा प्रकारची चर्चासत्रे सातत्याने आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.दुष्काळाचा सामना करताना तातडीच्या उपाययोजनांसोबतच दीर्घकालीन नियोजन आणि सर्व संबंधित घटकांमधील सातत्यपूर्ण संवाद आवश्यक असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
चर्चासत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर,धाराशिवचे संचालक डॉ.आर.बी.चौगुले,ज्ञान प्रबोधिनी केंद्र हराळीचे प्रमुख अभिजित कापरे,विभागप्रमुख डॉ.नितीन पाटील,केव्हीके तुळजापूरचे डॉ.सचिन सूर्यवंशी, टीआयएसएसचे संचालक डॉ. बाळ राक्षसे,प्रा.डॉ.संपत काळे, गणेश चादरे,डब्ल्यूओटीआर संस्थेचे प्रमुख अभिजित कवठेकर तसेच एसएसपी संस्थेच्या देवकन्या जगदाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.