30.7 C
Gondiā
Wednesday, September 9, 2026
Home मराठवाडा/खान्देश पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करा-पालकमंत्री प्रताप सरनाईक

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करा-पालकमंत्री प्रताप सरनाईक

0
3
पिण्याच्या पाण्यासह गुरांसाठी पाणी व चाऱ्याचे नियोजन करण्यावर भर
पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा
धाराशिव दि.9 सप्टेंबर 0यंदाचा पावसाळा हा जिल्ह्यासाठी आव्हानात्मक ठरत आहे. सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याने व पावसात दीर्घ खंड पडल्याने शेतीसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सिंचन प्रकल्पातील पाणीसाठाही अपेक्षा पेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे शेतीबरोबरच आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करण्यासोबत गुरांसाठी पाणी आणि चारा छावण्यासाठी आतापासून नियोजन करण्यात यावे,असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
आज ८ सप्टेंबर रोजी मुंबई येथील मंत्रालयातील दालनातून जिल्ह्यातील पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती आढावा दूरदृष्य प्रणालीद्वारे घेताना पालकमंत्री श्री.सरनाईक बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,धाराशिव पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री.थोरात,जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,कृषी विकास अधिकारी श्री. पाटील,ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कटकधोंड,जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी,वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री.मांजरमकर यांची तर सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार,सर्व गटविकास अधिकारी,सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी,सर्व तालुका कृषी अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांचे, तालुकास्तरीय यंत्रणाचे अधिकारी व्ही.सी.द्वारे सहभागी होते.
पालकमंत्री श्री.सरनाईक म्हणाले की,आतापासूनच शेतकऱ्यांना आवाहन करून पाण्याची बचत करण्यास सांगावे. पाणीपुरवठ्यासाठी आतापासूनच निविदा प्रक्रियेची कामे करावी. तालुकास्तरावर सरपंच व लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य घेऊन पाण्याबाबत जनजागृती करावी. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जनजागृती करावी.शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे.शाळेतील स्वच्छतागृहासाठी पाण्याच्या वापरासाठी आवश्यक ठिकाणी टाक्या बसवाव्यात.ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात देखील यावेळी तीव्र ऊन राहणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना उष्माघात होणार नाही, याची शिक्षण विभागाने दक्षता घ्यावी.