नांदेड ,दि.29 -नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास राहील. हा ध्यास पुर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव लोकाभिमुख राहील असा प्रयत्न करेन , असे मनोदय नूतन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी २८ एप्रिल रोजी नांदेड येथे येथे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्विकारल्यानंतर सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांशी बोलतांना व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार स्विकारल्यानंतर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून तसेच विविध घटकांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले व भावी सेवाकार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून अरुण डोंगरे यांची नांदेड जिल्हाधिकारी म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे. अरुण डोंगरे यांच्याकडे प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यांना २०१६ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा श्रेणी मिळाली आहे. तत्त्पुर्वी ते सन १९९१ मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत दाखल झाले होते. उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी-अमरावती, उपायुक्त महसूल व सामान्य प्रशासन-अमरावती, अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांना सन २००३ साली शासनाचा उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या कालावधीत अमरावती महापालीकेस केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतील आटो डीसीआर प्रणालीसाठी तसेच ई-इंडीया पुरस्कार मिळाला
मे २०१५ पासून ते सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सोलापूर जिल्हा परिषदेतही त्यांनी माहिती-तंत्रज्ज्ञानाद्वारे ई-ओपीडी, ई-ऑफिस, ई-लायब्ररी यासह ग्रामविकासाच्या विविध संकल्पना यशस्वीपणे राबविल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यास जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल सन २०१५ – १६ चा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे. तर सोलापूर जिल्हा परिषदेस यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामविकास विभागाचा सन २०१६ – १७ चा दुसरा क्रमांक मिळाला आहे.
नांदेड जिल्हाधिकारी म्हणून रुजू होताच अरुण डोंगरे यांचे जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी आदी घटकांकडून स्वागत करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, कोषागार अधिकारी मनोज गग्गड, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव, सहायक करमणूक कर अधिकारी मकरंद दिवाकर आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. रूजू होताच जिल्हाधिकारी डोंगरे यांनी प्रशासनातील विविध बाबींचा तसेच योजनांचा आढावाही घेतला.तत्पुर्वी शासकीय विश्रामगृह येथेही उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, दिपाली मोतीयेळे, अजित थोरबोले, तहसिलदार किरण अंबेकर आदींनीही नूतन जिल्हाधिकारी डोंगरे यांचे स्वागत केले.





