
गोंदिया,दि.24 : महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी बुधवारपासून (दि.२१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाभरातील कृषी सहायकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. हा त्यांच्या त्यांच्या उपोषण मंडपाला विविध पक्षाचे पदाधिकारी भेटी देत आहेत.उपोषणावर बसलेल्या कृषी सहायकांमध्ये पी.बी. काळे, पी.एम. सूर्यवंशी, जी.डी. नेवारे, जी.एन. घरत, ए.डब्ल्यू. खंडाईत, आर.एम. रामटेके, जी.सी. वाढई, बी.पी. डोंगरवार, आर.आर. भगत, जे.टी. मेंढे, व्ही.एन. गहाणे, एस.एस. लांडे, एस.वाय. ब्राह्मणकर, एम.के. कुंभलवार, डी.आर. पारधी, एस.के. गणवीर आदी अनेक कृषी सहायकांचा समावेश आहे
उपोषण स्थळावरील कृषी सहायकांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने ३१ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार स्वतंत्र मृद व जलसंधारण विभागाची निर्मिती करून कृषी विभागातील ९ हजार ९६७ कर्मचारी-अधिकारी वर्ग करून कृषी विभागाला पांगळा करण्याचा कट रचला. सद्यस्थितीत कृषी विभागात सर्व संवर्गाची ३० टक्के पदे रिक्त आहेत. त्यातच ९ हजार ९६७ पदे काढून मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग करणे हे कृषी विभागाचे वाटोळे करण्यासारखे आहे. पूर्वी मृद व जलसंधारण हे कृषी खात्याचे अविभाज्य अंग होते. परंतु आता वेगळे केल्याने कृषी विभागाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.यासह विविध मागण्यांसाठी कृषी सहायक संघटना विविध टप्प्यांमध्ये आंदोलन करीत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषण मंडपाला निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी बुधवार (दि.२१) भेट दिली व मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तर शुक्रवार (दि.२३) सेवानिवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे यांनी भेट दिली. तसेच आंदोलनाच्या भूमिका जाणून घेतल्या.
.





