24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home Featured News उमर यांच्या ‘अमिना’ या अहिराणी बोलीतील अनुवादित कादंबरीचे प्रकाशन

उमर यांच्या ‘अमिना’ या अहिराणी बोलीतील अनुवादित कादंबरीचे प्रकाशन

0
42

जळगाव,दि.25- साहित्यविषयीची आस्था असणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन दर महिन्याला चर्चा आणि कार्यक्रम घडवून आणावेत, नवागतांना प्रेरणा मिळावी यासाठी साहित्यदीप महाराष्ट्र परिषद जळगावच्या वतीने विविध कार्यक्रम घेतले जाणार आहे अशी माहिती डॉ. किसन पाटील यांनी दिली. यावेळी वर्षभर घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाविषयीचे भूमिकाकथन डॉ. प्रकाश सपकाळे यांनी केले. पुढील काळात लेखन कार्यशाळा, व्याख्याने, पुस्तक चर्चा, मुलाखती, पुस्तक प्रकाशने, परिसंवाद अशा स्वरूपाचे कार्यक्रम घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
साहित्यदीप महाराष्ट्र साहित्य परिषद जळगावच्या वतीने अण्णासाहेब बेंडाळे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोहम्मद उमर यांच्या ‘अमिना’ या सुखदेव वाघ यांनी अहिराणी बोलीत अनुवादित केलेल्या कादंबरीचे प्रकाशन प्रा.सी.एस.पाटील, डॉ. किसन पाटील, डॉ.प्रकाश सपकाळे, चंद्रकांत भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अथर्व प्रकाशनचे युवराज माळी उपस्थित होते. वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
यावेळी कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी रा.शे. साळुंखे होते. यात विशाल पाटील, गोविंद देवरे, भीमराव सोनवणे, प्रफुल्ल पाटील, उदय येशे, गणेश सूर्यवंशी, आर.डी. चव्हाण, गोविंद पाटील, श.मु.चौधरी, रफीक पटवे, डॉ. प्रकाश सपकाळे, डॉ. किसन पाटील यांनी आपल्या कविता सादर केल्या. सूत्रसंचालन प्रा.सत्यजित साळवे तर आभारप्रदर्शन योगेश महाले यांनी केले.