
गोंदिया,दि.७ – शेतात जाण्यासाठीचा रस्ता मोकळा करुन देण्याच्या मागणीसाठी प्रशासनाकडे पाच वर्ष पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने शेतक-याने पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी करित आत्महत्या करण्याचा इशारा दिला. ही घटना आज शुक्रवारी(दि.६) सकाळी ७ वाजताच्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील भडंगा येथे उघडकीस आली. सायकांळ 5 वाजेपर्यंत शेतकरी पाण्याच्या टाकीवरच बसून होता.दरम्यान ज्या द्वारकाप्रसाद दमाहे नामक शेतकर्याने अतिक्रमण करुन रस्ता अडविला त्यानेही आज दुपारच्या सुमारास विष प्राशन केल्याने त्याला केटीएस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कोमल प्रसाद कटारे, रा. भडंगा, असे वीरूगिरी करणा-या शेतक-याचे नाव आहे. त्यांच्या शेतात जाणारा रस्ता दमाहे नामक शेतक-याने शासकीय जागेवर अतिक्रमण करुन बंद केला. त्यामुळे शेतात जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी कटारे यांनी मागील ५ वर्षापासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकदा त्याने न्यायासाठी आंदोलनही केले होते.त्यावर जिल्हाधिकारी यांनी शासकीय 14 आर जागेवर दमाहे नामक कुटूंबाने केलेले अतिक्रमण हटवून सदरचा रस्ता खुला करण्याचा निर्णयही दिला होता.परंतु त्या निर्णयाची अमलबजावणी न झाल्याने शेतक-याला शेतात जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईच्या धोरणाला कंटाळून कोमल कटरे हा शेतकरी शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास गावातील पाणी टाकीवर चढला. शेतात जाणारा रस्ता मोकळा करून दिला नाही तर आत्महत्या करण्याचा इशारा दिला. या घटनेची माहिती गावात पसरताच गावकरी मोठ्या संख्येनीे पाणी टाकीजवळ गोळा झाले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच गोरेगावचे तहसीलदार तहसीलदार कल्याणकुमार डहाट,पोलिस निरिक्षक नारनवरे हे कर्मचा-यांसह घटनास्थळी पोहोचले. कटरेची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र यापूर्वी देखील प्रशासनाने आश्वासने देवून त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे आश्वासनावर माघार घेण्यास कटारेने नकार दिला. कटारे यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले की समोरच्या शेतकर्याची फक्त 36 आर जागा होता.परंतु त्याने भूमिअभिलेख विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांना हाताशी धरुन शासकीय 14 आर जागा आपल्या नावे करुन अतिक्रमण करुन त्या जागेवरुन माझे जाणे येणे बंद केले.त्यासाठी 2011 पासून मी न्याय माग आहे.परंतु अधिकारी मला चुकीचे आश्वासन देऊन बोळवण करीत आले.परंतु आज जोपर्यंत निर्णय लागत नाही,तोपर्यंत मी उतरणार नाही असे सांगितले.कोमल कटारे या वीरुगिरी करणा-या शेतक-याची समजूत घालण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात आले. सायंकाळी वृत्तलिहेपर्यंत कटारे यांचे आंदोलन सुरूच होते. घटना स्थळावर पोलीस विभागाचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. तहसीलदार कल्याणकुमार डहाट, नायब तहसीलदार सोमनाथ माळी,पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तलाठी डहाट व तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
भंडगा येथील शेतकरी कोमल कटारे यांच्या शेतात लागूनच द्वारकाप्रसाद दमाहे यांची शेती असून कटारे यांच्या शेताला लागून सरकारी जमीन आहे. त्याच जमिनीतून कोमलप्रसाद कटारे यांच्या शेतात जाण्याचा रस्ता आहे. या रस्त्यावर व जागेवर द्वारकाप्रसाद दमाहे यांनी अतिक्रमण करुन रस्ता बंद केल्याचे कोमलप्रसाद कटरे यांचे म्हणणे आहे. गेल्या ५ वर्षापासून शासन व प्रशासनाला पुरावे सादर करुन अतिक्रमित जमिन शासन जमा करुन रस्ता मोकळा करुन द्या. यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. शेवटी न्यायालयाच्या निर्णयानुसार १५ फुटांचा रस्ता कटरे यांना तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी मिळवून दिला. पण हे प्रकरण द्वारकाप्रसाद दमाहे यांनी न्यायालयात प्रविष्ठ केल्यामुळे न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत रस्ता पुन्हा बंद केला. परिणामी कटरे यांची शेती गेल्या चार वर्षापासून पडीक आहे. त्यामुळे शेतक-यांनी हतबल होऊन शेवटी पाण्याच्या टाकीवर चढून न्याय द्या अन्यथा आत्महत्या करण्याचा इशारा दिला.





