
गडचिरोली,दि.२३: गडचिरोली जिल्हा आदिवासीबहूल जिल्हा असून जंगलाने व्यापलेला जिल्हा आहे. येथील आदिवासींचा विकास नक्षल चळवळीमुळे प्रभावीत झाला आहे. नक्षल्यांमुळे शासनाच्या योजना आदिवासींपर्यंत पोहचण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आदिवासींच्या प्रगतीत अडसर न ठरता नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, असे आवाहन केद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे केले.
केद्रीय रिझर्व्ह पोलिस बल १९२ बटालियनच्या परिसरात आयेाजित सिविक अॅक्शन प्रोग्राम २०१७-१८ च्या उपक्रमाचे उद्घाटन श्री.अहीर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलाचे उप महानिरीक्षक राजकुमार, सी.टी. शेखर, प्रभारी जिल्हाधिकारी अशोक चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उप पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, प्रभाकर त्रिपाठी उपस्थित होते.
यावेळी आदर्श मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने शहिदांवर लिखित जगणे माझे या पुस्तकाचे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.नक्षलांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांच्या जीवनगाथेवर आधारित जगणे माझे या पुस्तकाची निर्मिती पुण्याच्या आदर्श मित्र मंडळ व बल्लारपूरच्या नृसिह पतसंस्थेच्या वतीने डाॅ.संध्या पवार यांनी यांनी संपादित केली आहे.मुळ संकल्पना व संकलन श्रीनीवास सुंचूवार यांची आहे.
केद्रीय रिझर्व्ह पोलीस बल 192 बटालीयनच्या कँम्पसमध्ये आयेाजित सिविक एक्शन प्रोग्राम 2017-18 च्या उपक्रमाचे उद्घाटनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आज जिल्हयात प्रतिकूल परिस्थीत असतांनाही योजना लाभार्थ्यांच्या दारात पोहचविण्यात येत आहेत. या नक्षल चळवळीमुळे विनाकारण जिशक्ती सिमेवर खर्च व्हायला पाहिजे होती ती आपल्याच लोकांशी भांडताना खर्च होत आहे. त्यामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन जिल्हयाचा विकासास गती देण्यास सहकार्य करावे. नक्षलवाद्यानी येथील प्रशासनाला, दुर्गम भागातील नागरिकांना वेटीस धरण्यापेक्षा त्यांनी सिमेवर जाऊन देश रक्षणाचे कर्तव्य बजावावे असेही आवाहन त्यांनी केले.युवकांनी नोकरीच्या शोधात न भटकता आपल्याच गावात परपंरागत व्यवसायासोबत कुकूट पालन, बकरी पालन, दुग्ध व्यवसाय, शिलाई मशिन, संगणकावरील कामे आदिचे प्रशिक्षण घेऊन आपला स्वयंरोजगार करावा व आपला विकास आपणच करावे असेही ते म्हणाले. शासन अनुदान तत्वावर आपणास याकरीता साधनसामुग्री उपलब्ध करुन देत आहे. तसेच कौशल्य विकासाच्या अंतर्गत मोठया प्रमाणात युवकांना विनामुल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे त्याचाही लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.




