गोंदिया,दि.15 : भारतीय वनसेवेतील आठ वरिष्ठ वनाधिका-यांचे बदली आदेश महूसल व वने विभागाने काढले आहे. यात ठाणे येथील प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये आणि नागपूर येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक दिलीप सिंग यांना बढती मिळाली आहे.
राज्याच्या महसूल व वने विभागाने बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या शासन आदेशानुसार आठ आयएफएस अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नागपूर येथील अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग) दिलीप सिंग यांची नागपूर येथील महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या सदस्य सचिवपदी नियुक्तीने बढती दिली आहे. ठाणे येथे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांची नागपूर येथे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) पदी बढती देण्यात आली आहे. धुळे येथे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) आर. एस. कदम यांची ठाणे येथील मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), पुणे येथील मुख्य वनसंरक्षक (संशोधन) टी.एन. साळुंखे यांची धुळे येथील मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), पनवेल येथील उपवनसंरक्षक (भूमी अभिलेख) एन.बी. गुदगे हे औरंगाबाद येथे सामाजिक वनीकरणात वनसंरक्षकपदी, धुळे येथील उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांची पेंच व्याघ्र प्रकल्पात उपसंचालकपदी, दीर्घकालीन रजेवर असलेले राकेश सेपट यांची रायगड जिल्ह्यातील रोहा येथे उपवनसंरक्षक (प्रादेशिक) तर रोहा येथील उपवनसंरक्षक (प्रादेशिक) विजय सुर्यवंशी यांची नाशिक येथे सामाजिक वनीकरणाच्या उपवनसंरक्षकपदी बदली करण्यात आली आहे.



