28.5 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home विदर्भ वन्यजीव कार्यालयासमोर वनमजुरांचे उपोषण

वन्यजीव कार्यालयासमोर वनमजुरांचे उपोषण

0
49

साकोली,दि.16ः- नागझिरा वन्यजीव अभयारण्यात हंगामी वनमजूर म्हणून २00७ ते २0११ मध्ये कामावर असलेल्या २१ मजुरांना वन्यजीव विभागाकडून २0११ मध्ये कमी करण्यात आले. त्यामुळे वनमजुरांनी कामगार न्यायालयात धाव घेतली. भंडारा कामगार न्यायालयाने सदर मजुरांना कामावर रुजू करण्याचे आदेश दिल्यानंतरही वनविभागाचे अधिकारी सदर वनमजुरांना कामावर घेत नसल्यामुळे या वनमजुरांनी जि. प. सदस्य डॉ. नेपाल रंगारी व वनकामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज रामटेके यांच्या नेतृत्वात बुधवारी (दि.१५) वन्यजीव कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे.
जि. प. सदस्य रंगारी यांच्या नेतृत्वात कुटुंबियांसह या वनमजुरांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सदर प्रकरण चिघळू नये म्हणून साकोलीचे तहसीलदार अरविंद हिंगे, पोलिस निरीक्षक परमेश्‍वर पिपरेवार यांनी वन्यजिव विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. परंतु, काहीच तोडगा निघालेला नाही.
याबाबत जि.प. सदस्य रंगारी यांनी वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली. परंतु, या विषयावर कोणतेही अधिकारी उत्तर देत नसल्यामुळे जि. प. सदस्य डॉ. नेपाल रंगारी यांच्या नेतृत्वात बुधवारपासून उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या उपोषणात एकूण २१ पुरूष, २१ महिला व ९ मुले बसले आहेत. जोपर्यंत वनमजुरांच्या मागण्या मंजूर होत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
सन २00६ ते २0११ पर्यंत या २१ लोकांना वन्यजीव विभागाने वनमजूर म्हणून कामावर ठेवले होते. त्यानंतर २0११ पासून कामावरून काढून टाकले व त्यांच्याठिकाणी दुसर्‍या हंगामी वनमजुरांना कामावर नियुक्त केले. कामावरून कमी केल्यामुळे त्यांनी भंडारा कामगार न्यायालयात धाव घेतली. कामगार न्यायालयात ६ वर्ष प्रकरण चालले. ३0 जुलै २0१७ ला कामगार न्यायालयाने वन्यजीव विभागाला सर्व २१ वनमजुरांना नियमित कामावर ठेवण्याचे तसेच थकित वेतन देण्याचे आदेश दिले. दरम्यान, वनमजुरांनी वन्यजीव विभागाकडे रितसर अर्ज सादर केला. परंतु, अडीच महिन्याचा कालावधी लोटूनही त्यांना नियमित कामाचे आदेश देण्यात आले नाही. त्यामुळे सर्व२१ वनमजुरांवर व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.