
भंडारा,दि.16 ः- जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या पुर्ती समुहाच्या असलेल्या मानस अँग्रो साखर कारखान्यावर ऊसाला २६00 रुपये हमी भाव देण्यात यावा, या मागणीसाठी शेतकर्यांनी धडक दिली. परंतु, शेतकरी व कारखाना प्रशासनाच्या बैठकीत भाववाढीबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. २३00 रुपयांपेक्षा अधिक भाववाढ करण्यास पूर्ती उद्योग समुहाचे महाव्यवस्थापक समय बन्सोड यांनी नकार दिल्याने ही बैठक निष्फळ ठरल्याने शेतकर्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय किसान संघाचे महामंत्री यादोराव मुंगमोडे, पप्पू सेलोकर, सुधीर बांते, यादोराव कापगते, कवळू मुंगमोडे आदींनी केले.
पूर्ती उद्योग समुहाद्वारे संचालिक मानस अँग्रो युनिक क्र मांक ४ देव्हाडा बुज येथे आहे. यावर्षी कारखाना प्रशासनाने गाळप हंगाम सुरू होण्यापुर्वी ऊसाला हमीभाव २३00 रुपये देण्याचे जाहीर केले. मात्र ऊसाला येणारा खर्च व शेतकर्यांना मिळणारे उत्पन्न यात मोठी तफावत असल्याने हमीभाव वाढवून देण्याची मागणी शेतकर्यांनी केली.
१५ नोव्हेंबर रोजी गाळप हंगाम सुरू करण्याच्या निमीत्ताने कारखान्यात गव्हाण पुजनाचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रशासनातील पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. तेव्हा भारतीय किसान संघाने ऊसाचा हमी भाव वाढविण्याची मागणी करीत कारखान्यावर धडक दिली. कारखाना प्रशासन व भारतीय संघाच्या पदाधिकार्यांमध्ये झालेल्या बैठकीत ऊसाला २६00 रुपये हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली. परंतु, प्रशासनाने ती धुळकावून लावली. २३00 रुपयांपैक्षा अधिक भाव दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रशासनाने मांडली. त्यामुळे शेतकर्यांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे.





