25.5 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home महाराष्ट्र नागपूर विभागातील 37 हजार हेक्टर झुडपी जंगल राखीव वन म्हणून घोषित

नागपूर विभागातील 37 हजार हेक्टर झुडपी जंगल राखीव वन म्हणून घोषित

0
28

मुंबई,दि.16 : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने नागपूर विभागातील 37 हजार हेक्टरहून अधिक झुडपी जंगल क्षेत्र राखीव वन म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे.
नागपूर विभागातील झुडपी जंगल क्षेत्राबाबत केंद्र शासनाने गठीत केलेल्या उच्चाधिकार समितीच्या अहवालात 1 लाख 78 हजार 525 हेक्टर झुडपी जंगल क्षेत्रापैकी वन व्यवस्थापनास योग्य असलेले 92 हजार 116 हेक्टर क्षेत्र भारतीय वन अधिनियम, 1927 मधील कलम 4 व 20 अंतर्गत राखीव / संरक्षित वन म्हणून घोषित करण्याची शिफारस केली होती. भारतीय वन अधिनियम, 1927 मधील कलम 4 व 20 अंतर्गत राखीव वनक्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याचे अधिकार राज्य शासनास आहेत. त्यानुसार राज्य शासनाने आतापर्यंत 37,490.112 हेक्टर क्षेत्र राखीव वन म्हणून अधिसूचित केले आहे. उर्वरित झुडपी क्षेत्र राखीव वनक्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असून आणखी 50 हजार हेक्टर झुडपी जंगल क्षेत्र डिसेंबर अखेरपर्यंत राखीव वन म्हणून अधिसूचित करण्यात येईल. सदर क्षेत्रास आता भारतीय वन अधिनियम, 1927 च्या तरतुदी लागू होणार असल्याने ते अधिक संरक्षित होईल तसेच त्यामुळे महाराष्ट्राच्या राखीव वनक्षेत्रात देखील वाढ होणार आहे.
या क्षेत्रावर पुढील पावसाळ्यात वनीकरणाची कामे घेण्यात येतील, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. नागपूर विभागातील अधिसूचित क्षेत्रामध्ये नागपूर जिल्ह्यातील 1419.12 हे., वर्धा जिल्ह्यातील 5266.75 हे., गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील 25863.312 हे., गडचिरोली जिल्ह्यातील 3093.58 हे., चंद्रपूर जिल्ह्यातील 1847.32 हे. याप्रमाणे 37490.112 हे. इतके झुडपी क्षेत्र राखीव वन म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे.