
औरगांबाद,(वृत्तसंस्था)दि. 25ः-शिवसेनेचे आमदार व महाराष्ट्र सरकारचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे विधानसभा सदस्यत्त्व शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केले. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
२0१४ मधील विधानसभा निवडणुकीवेळी खोतकर यांनी मुदत उलटून गेल्यानंतर उमेदवारी अर्ज भरला, असा आरोप गोरंट्याल यांनी याचिकेत केला होता. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्जुन खोतकर यांनी वेळ संपल्यानंतर स्थानिक उपविभागीय अधिकार्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे ते निवडणूक लढवण्यास पात्र नाहीत, असे याचिकेत म्हटले होते. या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती नलावडे यांनी निकाल दिला. २0१४ मधील विधानसभा निवडणुकीमध्ये खोतकर अवघ्या २९६ मतांनी विजयी झाले होते.
या निकालानंतर अर्जुन खोतकर यांनी आपण याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी उच्च न्यायालयाकडून खोतकर यांना ४ आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. मी अर्ज दाखल करण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरायला गेलो होतो. अर्ज भरण्यासाठी ३ वाजेपयर्ंतची वेळ देण्यात आली असली तरी शेवटच्या दिवशी जितके जण निर्धारित वेळेत कें द्रावर दाखल होतात, त्या सर्वांचे अर्ज दाखल करून घेतले जातात. मी ३ वाजण्यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या परिसरात होतो. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या माझा अर्ज वैध ठरला पाहिजे, असे खोतकर यांनी सांगितले.





