विदर्भ विकास मंडळाचा सामंजस्य करार

0
9

नागपूर,दि.24 : विदर्भ विकास मंडळाच्या सभागृहामध्ये विदर्भ विकास मंडळाची सन 2017-18 ची तिसरी बैठक विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकी दरम्यान रिसर्च ॲण्ड रिसर्जन्स फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेसोबत विदर्भाच्या विकासासंबंधी सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य तथा माजी आमदार ॲड. मधुकर किंमतकर, तज्ज्ञ सदस्य डॉ. कपील चांद्रायाण, डॉ.आनंद बंग, अपर आयुक्त तथा विदर्भ विकास मंडळाच्या सदस्य सचिव डॉ.निरुपमा डांगे, सहसंचालक अ.रा.देशमुख, उपायुक्त बी.एस.घाटे, आर.एफ.आर. फाऊंडेशनचे अध्यक्ष मुकूल कानेटकर, बी.एस.एम. विदर्भाचे सचिव महेश बक्षी, विदर्भ विकास मंडळाचे सदस्य डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ.किशोर मोघे उपस्थित होते.
विदर्भामध्ये विपूल प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्यामध्ये खनिजे, दगडी कोळसा, पाणी व वनसंपत्ती या महत्त्वाच्या नैसर्गिक संसाधनामधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विदर्भाच्या विकासासाठी वापर करण्यात यावा. तसेच यावर संशोधन करुन त्याचा विदर्भाच्या विकासासाठी लाभ होईल. अशा प्रकारचे प्रयत्न या माध्यमातून करण्याच्या दृष्टीने हा सामंजस्य करार करण्यात आला.
जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या लोणार सरोवरच्या संवर्धनासाठी स्थानिक ‘मी लोणारकर’ ग्रुपद्वारा लोणार सरोवर व तेथील वनसंपत्तीचे संवर्धन करण्याच्या हेतूने प्रयत्न करण्यात येत आहेत. या ग्रुपच्या कार्याची विदर्भ विकास मंडळाद्वारा दखल घेण्यात आली आहे. या ग्रुपच्या ‘गुड प्रॅक्टीसेस’ या प्रक्रियेचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसार व प्रचार व्हावा याकरिता या उप्रक्रमाच्या धर्तीवर अशा प्रकारचा उपक्रम जनतेकडून राबविण्यात यावा. त्यासाठी पुस्तिकेच्या माध्यमातून या ग्रुपद्वारा करण्यात आलेल्या परिसर स्वच्छता, वन संवर्धन, इतर सामाजिक उपक्रम तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी लोकांच्या मिळविलेला सहभाग, त्यांना मिळालेली प्रेरणा या बाबींचा त्यामध्ये समावेश करुन विदर्भ विकास मंडळाला सुपूर्द करावा. त्यामुळे राज्यामध्ये अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यासाठी विदर्भ विकास मंडळातर्फे प्रयत्न करण्यात येतील, असे विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी सांगितले.
यावेळी विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या समस्या व त्यावरील उपाय, यवतमाळ जिल्हा विकासाचा अहवाल, विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय विकास कृती आराखडा तयार करणे तसेच विदर्भ विकासाच्या व्यूवहरचनेचा अभ्यास यावर बैठकी दरम्यान चर्चा करण्यात आली.