गोंदिया,दि.15ः-केंद्र व राज्य शासनाने ‘स्टॅण्ड अप इंडिया’च्या माध्यमातून अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील तसेच महिलांना उद्योजक घडविण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी डिक्की व सिडबी या दोन सामाजिक संस्थेने स्वीकारली आहे. यासाठी राज्यात पहिले जनजागृती अभियान कार्यक्रम १६ डिसेंबर रोजी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित करण्यात आले आहे.
या माध्यमातून जिल्ह्यात वर्षभरात जवळपास १00 हून अधिक उद्योजक घडविण्याचा संकल्प घेण्यात आला आहे, अशी माहिती डिक्कीच्या पदाधिकार्यांनी दिली आहे.
स्थानिक विर्शामगृहात आयोजित पत्रपरिषदेत जिल्हाधिकारी तथा जि.प.चे सीईओ रवींद्र ठाकरे, डिक्कीच्या वतीने पश्चिम भारताचे अध्यक्ष निश्चय शेडके, विदर्भ अध्यक्ष गोपाल वासनिक, जिल्हाध्यक्ष चंदू पाटील, जिल्हा समन्वयक दलेश नागदवने उपस्थित होते.
गोंदिया जिल्ह्यात वर्षभरात जवळपास १00 हून अधिक उद्योजक घडविण्यात येणार, असाही त्यांनी विश्वास दर्शविला. यासाठी गोंदिया येथे १६ डिसेंबर रोजी उद्योग जागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बेरोजगारांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.




