१६ कोटींचा प्रोत्साहनपर निधी मिळवणारा विभागातील एकमेव जिल्हा
वाशिम, दि. १६ ऑगस्ट : जागतिक बँकेच्या सहाय्याने मित्रा, नियोजन विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘महास्ट्राइड’ प्रकल्पांतर्गत जिल्हा विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल वाशिम जिल्ह्याने राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्ह्याला १६ कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी मंजूर झाला असून, अमरावती विभागातून या प्रोत्साहनासाठी निवड झालेला वाशिम हा एकमेव जिल्हा ठरला आहे.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या पुढाकाराने आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे जिल्ह्याने ही कामगिरी साध्य केली. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा प्रमुख, महास्ट्राइड अनंता मुदगले आणि सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संजय राठोड यांचा जिल्ह्याच्या कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला.
‘महास्ट्राइड’ प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याची अर्थव्यवस्था सन २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या व्यापक उद्दिष्टाला जिल्हानिहाय योगदान देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत वाशिम जिल्ह्याचा जिल्हा धोरणात्मक आराखडा तयार करण्यात आला असून, सन २०२८ पर्यंत जिल्ह्याचे सकल जिल्हा देशांतर्गत उत्पादन ३९ हजार ८०२ कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील स्थानिक संसाधने, कृषी क्षमता, उद्योग, सेवा क्षेत्र, पर्यटन, पायाभूत सुविधा आणि रोजगारनिर्मितीच्या संधींचा विचार करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या विकासात कृषी व संलग्न क्षेत्राला विशेष महत्त्व देण्यात आले असून, कृषी प्रक्रिया उद्योग, कृषी पर्यटन, कृषी-आधारित समूह, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, नवीकरणीय ऊर्जा, आरोग्य, महिला-केंद्रित आर्थिक विकास, शिक्षण तसेच धार्मिक पर्यटन या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे.
या कामगिरीसाठी जिल्ह्यातील विविध विभागांचा समन्वय महत्त्वाचा ठरला. जिल्हा विकास आराखड्याशी संबंधित माहिती, आवश्यक कागदपत्रांचे संकलन व पडताळणी तसेच विभागनिहाय कामकाजाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभागांच्या प्रमुखांनी दिलेल्या सहकार्यामुळे जिल्ह्याला ही उल्लेखनीय कामगिरी करता आली.





