गडचिरोली,दि.16: शेतकरी व मजुरांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला.६० वर्षे व त्यापेक्षा जास्त्ा वय असलेल्या शेतकऱ्यांना एकरी १ हजार रुपये मासिक पेंशन सुरु करावे, सर्व शेतकऱ्यांचा विमा काढून सर्पदंश, वज्राघात, अपघात, आत्महत्या व रासायनिक औषधे फवारताना मृत्यू झाल्यास संबंधित शेतकरी व मजुरांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत करावी, कृषिपंपांच्या वीजबिलाची वसुली बंद करुन २०११ पासून आतापर्यंतच्या वीजबिलाची रक्कम माफ करावी, विकास प्रकल्पांच्या नावाने शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी कवडीमोल भावाने संपादित करुन त्या भांडवलदारांच्या घशात घालणे बंद करावे, प्रलंबित वैयक्तिक वनहक्क दावे तत्काळ निकाली काढावे, तसेच त्यांना सातबारा वाटप करावे, शेतकऱ्यांच्या मुलांची प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ वितरीत करावी इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. धानाला भाव नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता असताना सरकार मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे, असा आरोप जयश्री वेळदा यांनी केला. भाषणानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात श्यामसुंदर उराडे, विजया मेश्राम, प्रिया कुमरे, चंद्रकांत भोयर, श्रीधर मेश्राम, नरेश मेश्राम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
शेकापचे निमंत्रक रामदास जराते, रोहिदास कुमरे, महिला नेत्या जयश्री वेळदा आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले. दुपारी १ वाजता तहसील कार्यालयापासून मोर्चास सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर तेथे रामदास जराते, रोहिदास कुमरे, जयश्री वेळदा यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी रामदास जराते म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने शेतकरी व शेतमजुरांसाठी काहीच केले नाही. कर्जमाफी केल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांचे कर्जमाफ झाले नाही. जीएसटी लागू केल्याने महागाई वाढत असून, सामान्य नागरिकांचे जिणे कठीण झाले आहे. हे सरकार शेतकरी व कष्टकऱ्यांसाठी कमी आणि भांडवलदारांसाठी अधिक काम असल्याचा आरोप रामदास जराते यांनी केला. २०१९ च्या निवडणुकीत शेतकरी या सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.





