गोंदिया,दि.16 : महाराष्ट्र विधानमंडळच्या अनुसूचित जमाती कल्याण समिती 18 ते 20 जानेवारी 2018 या कालावधीत जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. विधानसभा सदस्य डॉ.अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीमध्ये 15 सदस्यांचा समावेश आहे. या समितीकडून जिल्ह्यात विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या आदिवासी विकासाच्या योजनांची पाहणी करण्यात येणार आहे. ही समिती आदिवासी विकासाच्या योजनांचा आढावा देखील घेणार आहे. जिल्हाधिकारी तसेच विविध शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत आदिवासी विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी समितीची बैठक घेणार आहे. 18 जानेवारीला या समितीची लोकप्रतिनिधींसोबत बैठक सुध्दा आयोजित करण्यात आली आहे.





