
पाटणा – बिहारमध्ये मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांना उद्या (शुक्रवार) विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे आहे. आजपासून सुरु झालेल्या अधिवेशनात विधानसभा सभापतींनी सदस्य संख्येच्या आधारावर जनता दलाला (यू) विरोधीपक्षाचा दर्जा दिला आहे. जदयू आमदार विजय चौधरी यांना विरोधीपक्ष नेता निवडण्यात आले आहे. याआधी भारतीय जनता पक्षाकडे (भाजप) हे पद होते. विरोधीपक्ष नेतेपद गेल्याने भाजप आमदार संतप्त झाले आहेत. त्यांनी सभापती उदय नारायण चौधरी यांच्या कार्यालयाबाहेर धरणे धरले आहेत. यावेळी काही भाजप आमदारांनी तिथे तैनात मार्शल बरोबर धक्काबुक्की केली. संतप्त आमदारांनी कार्यालया बाहेरील कुंड्यांची तोडफोड केली.
20 फेब्रुवारीला मुख्यमंत्री मांझींची बहुमताची परीक्षा
बिहारसह संपुर्ण देशाचे लक्ष उद्या (शुक्रवार) बिहार विधानसभेकडे असणार आहे. जदयू नेते आणि माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्याची जबाबदारी जीतनराम मांझी यांच्या खांद्यावर दिली. मात्र मांझी यांनी जदयूसोबत बंड पुकारून आता त्यांनाच विरोधीबाकांवर बसण्यास भाग पाडले आहे. आता सध्या त्यांच्यासोबत 12 आमदार आहेत. त्यांचा दावा आहे, की दोन अपक्ष देखील त्यांच्यासोबत आहे. या 12 सदस्यांसह मांझी शुक्रावारी बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहेत. कदाचित ऐनवेळी भाजप त्यांना साथ देण्याची शक्यता आहे. पण अद्याप राज्य भाजपने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यांनी केंद्रीय नेतृत्वावर या निर्णय सोडला आहे.





