
मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युपीए सरकार ‘मर जवान, मर किसान’ या धोरणावर चालत असल्याची टीका केली होती. मात्र आता भाजप सत्तेत आल्यावर केंद्रातील व महाराष्ट्रातील सरकार याच धोरणावर चालत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. नरेंद्र मोदी यांनी विदर्भातील शेतक-यांसोबत ‘चाय पे चर्चा’ केली होती. पण त्याच गावातील मोदींच्या चर्चेत सहभागी झालेल्या शेतक-याने आत्महत्या केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसिद्धी स्टंट करीत शेतक-यांच्या घरी मुक्काम ठोकतात पण या लोकांना विधीमंडळात शेतक-यांच्या प्रश्नांवर साधी चर्चा करण्याचीही इच्छा नाही अशी घाणाघाती टीका विधीमंडळातील राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधीमंडळात शेतक-यांना तुंटपुंजी मदत मिळाल्याचे मान्य केले. तसेच केंद्राकडे मदत मागितली आहे पण त्यांनी अद्याप एक रूपयाचीही मदत दिली नाही. केंद्राने मदत न देताही आम्ही शेतक-यांना दोन हजार कोटी रूपयांची मदत केली आहे. 78 टक्के मदतरक्कम शेतक-यांना दिली आहे. उर्वरित मदत केंद्राचे पॅकेज आले की दिले जाईल असे आश्वासन खडसे यांनी विरोधकांना दिले. मात्र, पंचनामे झाल्याशिवाय सरकारकडून मदत दिली जाणार नाही असे खडसेंनी सांगतचा विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर काही वेळांसाठी विधानसभा तहकूब करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील शेतकरी अवकाळी पावसाने हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याला झोडपले असून शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले, त्याकडे शेतकरी आशेने पाहत होता. मात्र त्या शेतकऱ्याला सरकारने कुठलीही मदत केलेली नाही. त्यामुळे आपल्याला कुणी वाली नाही, अशी भावना शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यातून तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला. शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना आश्वासने दिली गेली, त्यांनी अपक्षेने नरेंद्र मोदी यांना निवडून दिले. पण त्यांनाच आश्वासनांचा विसर पडला तर शेतकऱ्यांनी कुणाकडे आशेने बघायचे, हा प्रश्न उभा राहतो. सरकारने या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी हेक्टरी 25 हजारांची त्वरीत मदत करून या शेतकऱ्यांना या संकटातून पुन्हा उभे राहण्याची ताकद द्यावी, अशी मागणी विधीमंडळातील राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी सरकारकडे केली आहे.




