
नांदेड,दि.18ः-जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील चिकना येथे तंबाखूला धूर देण्यासाठी आपल्या शेतात गेलेले शेख चांद पाशा खाजामिया वय 55 वर्षे व त्यांचा मुलगा वंशजचांद पाशा वय 22 यांचा तंबाखू धूर देण्याच्या हेतूने भटीजवळ गेलेल्या पिता पुत्राचा भट्टीमध्ये पाय घसरून पडल्याने दोघांचा जागीच करुण अंत झाला आहे.
धर्माबाद तालुक्यामध्ये सीमावर्ती भाग तंबाखूचे पीक अधिक प्रमाणात घेतले जात असून या तंबाखूच्या पानांना धूर देण्याची पद्धत आहे. तालुक्यातील सीमावर्ती भागात प्रामुख्याने तंबाखूची पीक घेतले जाते. सदर तंबाखू परिपक्व करण्यासाठी त्याला धुरावर भाजणे गरजेचे असते म्हणून नेहमीप्रमाणे हे पितापुत्र आपल्या शेतातील तंबाखूला धूर देण्यासाठी आज सकाळी आपल्या शेतात गेले. दिवस संपायला येऊनही ते घरी न परतल्याने घरच्यांनी शेताकडे जाऊन पाहणी केली असता सदरील तंबाखूच्या भट्टीच्या ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळून आला.
हा मृतदेह पुर्णपणे जळून खाक झाला होता. सकाळी शेताकडे गेलेले पिता-पुत्र अद्यापही घरी परतले नाहीत म्हणून घरची मंडळी शेतात जाऊन पाहनी केली आसता हा प्रकार आज उघडकीस आला. याबाबतची माहिती धर्माबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.




