मुंबई,दि.27 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी विधिमंडळात अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे. पुढील चार महिन्यांच्या आवश्यक आर्थिक खर्चाची तरतूद त्यात असेल, पण यानिमित्ताने निवडणुकीच्या तोंडावर सवलतींच्या काही घोषणादेखील करण्यात येतील, अशी शक्यता आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचा सन २०१९-२०चा अंतरिम अर्थसंकल्प आज, बुधवारी दुपारी २ वाजता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर केला जाणार आहे. अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेच्या सभागृहात अर्थसंकल्प मांडतील.
आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन तीन महिन्यांसाठी लेखानुदान मंजूर करण्यासाठी सध्या मुंबईत विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. अंतरिम अर्थसंकल्पात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या कोरडवाहू आणि जिरायत शेतकऱ्यांना अनुदान जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याशिवाय, निवडणुकांचा हंगाम असल्यामुळे रोजगाराबाबत आणि महापुरुषांची स्मारके व पुतळ्यांबाबत भरीव निधीची तरतूद होईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते.
चालू आर्थिक वर्षात सादर झालेल्या तब्बल ३६ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आणि सरकारच्या डोक्यावर असलेले सुमारे पाच लाख कोटींचे कर्ज अशी परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांसह विविध समाजघटकांसाठी निवडणुकीआधी काही घोषणा होऊ शकतात.दरम्यान, लोकसभा निवडणूक वर्षात अंतरिम अर्थसंकल्प मांडणारे मुनगंटीवार हे चौथे वित्तमंत्री आहेत. याआधी जयंत पाटील (२००४), दिलीप वळसे-पाटील (२००९) आणि अजित पवार (२०१४) यांनी वित्तमंत्री या नात्याने अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता.





