नागपूर,दि.27ः- खासगी शाळांकडून वसूल करण्यात येणार्या भरमसाठ शुल्काच्या विरोधात शहरातील जागरूक पालकांनी रविवारी संविधान चौकात निदर्शने केली. नागपुरातील सजग आणि जागरूक पालकांनी खासगी शाळांच्या फीवाढीच्या विरोधात मोहीम उघडली आहे. सरकारच्या धोरणामुळे खासगी शाळांना प्रोत्साहन मिळते. दुसरीकडे शासकीय शाळांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शासकीय शाळा इमारतींची वाईट अवस्था असून, शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. साहजिकच पालक खासगी शाळांकडे वळले आहेत. त्याचा परिणाम खासगी शाळांनी त्यांच्या शुल्कात मोठय़ा प्रमाणात वाढ केली आहे. तसेच दरवर्षी कुठे १0 तर कुठे १५ टक्के फीवाढ केली जात आहे. यामुळे मुलांना शिकवणे कठीण झाले आहे. शाळा व्यवस्थापन पालकांचे ऐकत नाही, परवडत नाही तर मुलांचे नाव काढून टाका, अशी भाषा वापरली जात आहे. त्यामुळे पालक अक्षरश: रडकुंडीला आले आहेत. त्यातील काही पालकांनी धाडस करीत शाळा व्यवस्थापकांवर नियंत्रण आणण्यासाठी, फीवाढीच्या नियम करण्याच्या मागणीसाठी आज संविधान चौकात निदर्शने केली. यावेळी मोठय़ा प्रमाणात पालक उपस्थित होते.
नागपुरात अनेक खासगी शाळांमध्ये मनमानी शुल्क आकारणी केली जात असून, दरवर्षी त्यात २0 टक्के वाढ केली जाते. ही वाढ करताना पालकांची परवानगी घेतली जात नाही. राज्याचे शिक्षक खातेही काहीही करीत नाही. तक्रार केल्यावरच कारवाई करू अशी शिक्षण उपसंचालक कार्यालयाची भूमिका आहे, तर ज्या पालकांनी तक्रार केली त्याच्या मुलांना संबंधित शाळा त्रास देते. त्याचे नाव शाळेतून काढण्यासाठी दबाव आणला जातो, अशी पालकांची तक्रार आहे. शिक्षण खात्यातील अधिकारी आणि शाळा संचालक यांच्यातील हातमिळवणीमुळे मोठय़ा प्रमाणात लूट सुरू असून, त्याविरोधात अनेकवेळा ओरड झाली असली तरी प्रत्यक्षात प्रथमच पालक रस्त्यावर उतरले आहे. पुढच्या काळात हे आंदोलन अधिक पेटण्याची शक्यता आहे. मनमानी शुल्क आकारणी करणार्या काही प्रमुख शाळा या सत्ताधारी पक्षाशी संबंधित संस्था चालकांच्या आहेत. त्यांना त्यांच्या शाखा काढण्यासाठी सरकारी जमिनी अल्प किंमतीत देण्यात आल्या आहे. या शाळांच्या कार्यक्रमाला मंत्री जात असतात, हे येथे उल्लेखनीय.





