31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ निर्माणाधीन प्रशासकीय इमारतीची भिंत कोसळली

निर्माणाधीन प्रशासकीय इमारतीची भिंत कोसळली

0
101

blank

बुलढाणा,दि.१४ः-मेहकर येथील निर्माणाधीन प्रशासकीय इमारतीची वरच्या मजल्यावर भिंत चाळीस फुटांवरून अचानक कोसळली. रविवारी सुटीचा दिवस असल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. वारंवार पडझड होत असल्याने इमारत धोकादायक ठरू लागले आहे. निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा नमूना या घटनेनंतर दिसून आला.
मेहकर व लोणार उपविभागाचा कारभार एकाच ठिकाणी सांभाळता यावा, यासाठी मेहकरपासून तीन किलोमीटर अंतरावर खंडाळा परिसरात प्रशासकीय इमारत बांधकाम सुरू करण्यात आले. सहा वर्षे लोटली तरीही इमारत पूर्णत्वास आली नाही. वास्तविक दोन वर्षेच बांधकामाचा अवधी देण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी मेहकर तहसीलला लागलेल्या आगीत येथील उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय व निवडणूक विभाग जळून खाक झाला होता. त्यामध्ये रेकॉर्ड जळाले होते. या कार्यालयाचा कारभार पुढील काळात भाड्याच्या इमारतीत सुरू झाला. दरम्यान, लोकसभा निवडणूक आल्याने उपविभागीय अधिकारी कार्यालय व निवडणूक विभागाचे कामकाज निर्माणाधीन प्रशासकीय इमारतीत सुरू करण्यात आले.
वीस दिवसांपूर्वी मोठी खिडकी निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्याच्या अंगावर पडली होती. त्यात तो जखमी झाला. लाइन फिटिंगचे कामदेखील दर्जाहीन करण्यात आल्याचे चार वेळा इलेक्ट्रिक वायरिंग जळाल्यावर समोर आले. पंखे, इन्व्हर्टरसह अन्य वायरिंग जळाली होती.
या घटना ताज्या असतानाच रविवार, १४ जुलै रोजी इमारतीच्या वरच्या मजल्यावरून भिंत कोसळली. सुट्टी असल्याने परिसरात कोणी नव्हते त्यामुळे दुर्घटना टळली. इमारतीमध्ये उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, कृषी विभाग, तहसील, निवडणूक विभाग अशी कार्यालये आहेत. येथे नेहमीच गर्दी असते. या संपूर्ण बांधकामाची गुणनियंत्रण पथकातर्फे चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

blank