अर्जुनी मोर(संतोष रोकडे),दि.27ः- तालुक्यातील बोंडगाव देवी येथिल बीएसएनएल च्या दूरभाष केंद्राची वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा बंद केल्याने गेल्या चार-पाच दिवसांपासून बीएसएनएलची सेवा प्रभावित झाली आहे. अर्जुनी मोर हा तालुका आदिवासी नक्षलप्रभावीत आहे.विविध खाजगी कंपण्याचे जाळे तालुकाभर पसरले असले तरी लाखो मोबाईल धारक बीएसएनएलची सेवा घेत आहेत. तालुक्यात बीएसएनएलची फोर जी सेवा सुरु झाल्याने पुन्हा ग्राहकांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली.तालुक्यात अर्जुनी मोरगाव, नवेगाव बांध, महागाव, गोठणगाव, केशोरी, बोंडगाव देवी, इटखेडा, धाबेपवनी असे आठ दूरभाष केन्द्र व मोबाईल टावर आहेत. या आठही दूरभाष केंद्रात जनरेटरची व्यवस्था असली तरी हे महागडे जनरेटर पूर्णता बंद अवस्थेत आहे. त्यामुळे हे दूरभाष केन्द्र विजेच्या भरवशावर सुरू असतात.या आठही दूरभाष केंद्रांपैकी बोंडगाव देवी येथील दूरभाष केंद्राचे विज बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने विद्युत पुरवठा बंद करण्यात आल्यामुळे गेल्या आठवडाभरापासून बीएसएनएलची मोबाईल सेवा पूर्णतः ठप्प झाली आहे. यासोबतच इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली आहे बोंडगाव देवी दुरभाष केंद्रावर 1 लाख 47 हजार चारशे सत्तर रुपये वीज कंपनीचे पाच ते सहा महिन्याचे बिल थकित असल्याने वीज कंपनीने या दुरभाष केंद्राचा विद्युत पुरवठा बंद केला.





