41.6 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ सहा वर्षानंतर इटियाडोह धरण ओव्हरफ्लो

सहा वर्षानंतर इटियाडोह धरण ओव्हरफ्लो

0
120

blank

गोंदिया,दि.03 :जिल्ह्यात काल झालेल्या जोरदार पावसामुळे अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण १०० टक्के भरल्याने मंगळवारला सकाळी ४ वाजेच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले. जिल्ह्यात ७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तर सोमवारला कार्तिक सोमेश्वर गौतम (वय 20)हा युवक बोथली ते म्हसवानी रस्त्यावरील चुलबंध नाल्यातून वाहून गेला होता. त्याचा मृतदेह शोधून काढण्यात आपत्ती निवारण बचाव पथकाला आज मंगळवारी यश आले.
विशेष म्हणजे सहा वर्षानंतर हे इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाले आहे.धरणातून विसर्ग झाल्यानंतर जलपूजन करण्याच्या प्रथेनुसार स्थानिक तहसीलदार विनोद मेश्राम यांनी सकाळी १०.०० वाजता जलपूजन केले. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने पंधरा दिवसांपासूनच ओव्हरफ्लोची शक्यता वर्तवुन नदीकाठच्या गावांना इशारा दिला गेला होता.धरण ओव्हरप्लो झाल्याने पर्यटकांची संख्या वाढली असून तब्बल सहा वर्षानतर धरणातील पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी सध्या तालुक्यातील पर्यटक भेट देत आहेत.
जिल्ह्यात काल पडलेल्या जोरदार पावसामुळे गोंदिया तालुक्यातील रावनवाडी मंडळात ७० मिमी,तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा मंडळात ७० मिमी,वडेगाव मंडळात ९८.६०मिमी,अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अर्जुनी/मोरगाव-९५.४०मिमी,महागाव ९१.२०मिमी, केशोरी ६८.६०मिमी व सालेकसा तालुक्यातील साकरीटोला मंडळात ७६.४०मिमी पावसांची नोंद करण्यात आली.
सडक-अर्जुनी तालुक्यातील खजरी, बोथली व म्हसवानी येथे पावसाने पाणी लोकांच्या घरात शिरल्याने तेथे जनजीवन विस्कळीत झाले होते,ते आज हळूहळू पुर्वपदावर आले.रविवारी (दि.१) रात्री व सोमवारी (दि.२) सकाळी बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पावसाची टक्केवारी वाढली आहे.नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने काही घरांची पडझड होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याबरोबर अन्न, धान्य व कपडयांची नासधूस झाली आहे. मातीच्या घरांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे दिसत आहे. शेत शिवारात पाण्याचा तडाखा जास्त असल्याने शेतीची नासधूस झाली आह.इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाल्याने गाढवी नदीत पाण्याची पातळी वाढून सुरबंध, बोंडगाव, चीचोली, कèहांडली, खोकरी, दिनकरनगर, पुष्पनगर (अ) व (ब), जरूघाटा, वडेगावबंध्या, सावरी, बोरी व खोळदा ही गावे प्रभावीत होण्याची शक्यता असल्यानेस सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आला आहे.त्यातच रविवारला रात्रीला झालेल्या जोरदार पावसामुळे साकोली-कुरखेडा बस ही केशोरीपासून ५ किमी. अंतरावर असलेल्या धोबी नाल्यावरून तीन ते चार फूट पाणी वाहत असल्याने अडकली होती व तीन ते चार गावांचा संपर्क तुटला होता. पाण्यामुळे गावातील लोकांना बाजार करण्यासाठी केशोरी येथे जाता आले नाही. शिवाय या मार्गावरून गडचिरोली जिल्ह्याचा मार्ग ही बंद होता.

blank