-
विदर्भातील पहिल्या अद्ययावत तारांगणाचे लोकार्पण
-
जिल्हा वार्षिक योजनेतून उभारणी
वाशिम, दि. ०३ : जिल्हा वार्षिक योजनेतून नगरपरिषदेला उपलब्ध करून दिलेल्या निधीतून शहरात अद्ययावत तारांगण साकारले आहे. या तारांगणामुळे वाशिम शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. येथील टेम्पल गार्डनमध्ये उभारण्यात आलेल्या तारांगणाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक मोरे, उपमुख्याधिकारी श्री. पाटील, सुरेश मापारी, दिलीप जोशी, श्री. छापरवाल, लक्ष्मण इंगोले, वसंत इंगोले, ठेकेदार बी. एस. देशमुख यांच्यासह विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. त्याचबरोबर पायाभूत सुविधा निर्मितीला विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच मनोरंजनाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तारांगणाची उभारणी करण्यात आली आहे. या तारांगणामुळे शहराला नवीन ओळख मिळेल, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, तारांगणाची निर्मिती ही वाशिमकरांसाठी अभिमानाची बाब आहे. विदर्भातील हे पहिलेच तारांगण असून जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.प्रास्ताविकात श्री. हेडा म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेतून नागरपरिषदेला मिळालेल्या नाविन्यपूर्ण योजनेच्या निधीतून तारांगणाचे काम पूर्ण झाले आहे. वाशिममधील नागरिकांना यामुळे शिक्षण व विरंगुळा मिळणार आहे.यावेळी पालकमंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते कोनशीला अनावरण व फीत कापून तारांगणाचे लोकार्पण झाले. यावेळी त्यांनी तारांगणाची पाहणी केली.
असे आहे तारांगण…
वाशिम येथे उभारण्यात आलेल्या तारांगणामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. एकाच वेळी सुमारे ८० व्यक्ती बसू शकतील आशा वातानुकूलित घुमटाकार दालनात बसून डोळ्याला कोणतेही उपकरण न लावता त्रिमितीय (थ्री-डी) स्वरूपात अंतराळातील घडामोडींवर आधारित चित्रफिती पाहता येणार आहेत. सोबतच अंतराळात होणाऱ्या नवनवीन संशोधनाची माहिती, उपग्रहांचे प्रक्षेपण, विविध अंतराळ मोहिमा, सूर्यमालेतील ग्रहांची माहिती देणारी दालने आहेत. हॉलिग्राफीक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध, ग्रह, तारे यांच्या प्रतिमा तयार करण्यात येणार आहेत.





