गोंदिया,दि.१८ : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महिला आर्थिक विकास महामंडळ,गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने एस. एस. अग्रवाल म्यु. गर्ल्स हायस्कुल, गोंदिया येथे कापडी पिशव्यांचे वितरण कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला आर्थिक विकास महामंडळ, गोंदियाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, तसेच प्रमुख अतिथी एस. एस. अग्रवाल म्यु. गर्ल्स हायस्कुलचे मुख्याध्यापीका मोना वर्मा , माविमचे सहा. जिल्हा समन्वय अधिकारी सतिश मार्कंड उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलतांना महिला आर्थिक विकास महामंडळ, गोंदियाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी मार्गदर्शन करतांना प्लास्टीक पिशव्यांच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होत आहे, त्यामुळे शासनाने प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे.महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांनी कापडी पिशव्या तयार करण्यात येत आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांच्या वापराला आळा घालण्यास मदत होईल.या कापडी पिशव्यांचा दैनंदिन वापर वाढण्यास मदत होईल.शासनाने प्लास्टीक विरोधात जनजागृती अभियान सुरू केले आहे. प्लास्टीक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी कापडी पिशव्या वापरल्या गेल्या पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविकातुन माविमचे सहा. जिल्हा समन्वय अधिकारी सतिश मार्कंड यांनी प्लास्टीकच्या मोठ्या प्रमाणातील वापरामुळे निसर्गाचे समतोल बिघडत चालले आहे, गोंदिया जिल्ह्यात एकूण १० हजार कापडी पिशव्यांचे शालेय विद्यार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना कापडी पिशव्यांचा वापर करायला सांगून प्लास्टीक विरोधी जनजागृतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांना विनामुल्य कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक व्ही.आर. चौव्हान यांनी केले तर उपस्थितांचे आभार एस. एस. अग्रवाल म्यु. गर्ल्स हायस्कुलच्या मुख्याध्यापीका मोना वर्मा यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता माविमचे सहाय्यक प्रफुल अवघड, एकांत वरघणे, कुंजलता भुरकुडे, एस. एस. अग्रवाल म्यु. गर्ल्स हायस्कुलचे शिक्षक के. एस. राणे, बी. एस. नंदगडे, सी.बी. सहारे. एस.एल. वैद्य, व इतर शिक्षकांनी सहकार्य केले.





