गोंदिया,दि.20ःपर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्लास्टिकचे योग्य व्यवस्थापन गरजेचे आहे. लोकसहभागातून देशाला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांनी प्लास्टिक संकलनाच्या या महार्शमदान उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
महात्मा गांधी यांची १५0वी जयंती संपूर्ण देशात साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने ११ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण देशात स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबविला जात आहे. उपक्रमातंर्गत २ ऑक्टोबर रोजी महार्शमदान करावयाचे आहे. र्शमदानातून संपूर्ण जिल्ह्यात प्लास्टिक गोळा करणे, त्याचे वर्गीकरण करणे तथा त्याचे व्यवस्थापन करून संपूर्ण जिल्हा प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी व्यक्त केला. ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. ११ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान प्लास्टिक मुक्तीसाठी जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यासोबतच शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांचा सहभाग अभियानात घेण्याचे नियोजन आहे. दुसर्या टप्प्यात २ ऑक्टोबर रोजी स्वच्छतेची शपथ घेवून संपूर्ण जिल्ह्यात प्लास्टिक संकलनाचा महार्शमदान उपक्रम राबविण्यात येणार आहे. गावात जमा झालेला प्लास्टिक कचरा मध्यवर्ती ठिकाणात गोळा करावयाचा आहे. दरम्यान तिसर्या टप्प्यात ३ ते २७ ऑक्टोबर दरम्यान प्लास्टिकच्या कचर्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्यात येणार आहे. गोळा झालेला प्लास्टिक कचरा सिमेंट इंन्डस्ट्र्री, औष्णिक वीज केंद्र, रस्ते बांधणीच्या कामात यावा, यासाठी खासगी क्षेत्रातील उद्योजकांची मदत घेण्यात येणार आहे.
प्लास्टिकचे विघटन होत नाही. त्यामुळे ते पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे जमिनीचा कस कमी होतो. प्लास्टिक नदी, नाल्यात तुंबल्यामुळे पुरपरिस्थिती निर्माण होते. जनावरांनी प्लास्टिक गिळल्यामुळे त्यांची प्रजनन क्षमता कमी होते. शिवाय जनावरे दगावतात. समुद्री जीवांवर सुध्दा प्लास्टिकचा दुष्परिणाम झालेला आहे. प्लास्टिकमुळे संपूर्ण जैवविविधता धोक्यात आली आहे.
प्लास्टिक मुक्तीचा या उपक्रमात जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, उद्योजक, शैक्षणिक संस्था, पंचायत राज संस्था तथा सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, आपल्या परिसरात महार्शमदान राबवून प्लास्टिकचे संकलन करावे, सोबतच पॉलिथिनचा व प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी केले आहे.





