गडचिरोली,दि.20ः-गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अहेरी उपविभागीय हेडी अंतर्गत येणार्या पोलिस मदत केंद्र गट्टा (जां) हद्दीतील गट्टा ते एटापल्ली मार्गावरील जांबीया नाल्याच्या पुलानंतरचा भाग वाहून गेल्याने मोठा खड्डा पडला होता. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना तालुका मुख्यालयी ये-जा करण्यास जिकरीचे झाले होते. ही बाब लक्षात घेऊन पोलिस दलाने लोकसहभागातून सदर पुलाची दुरुस्ती केली.
एटापल्ली तालुक्यातील जांबीया नाल्यावरील पुलाच्या समोरील काही भाग पुरामुळे वाहून जाऊन मोठा खड्डा पडला होता. यामुळे मागील पंधरा दिवसांपासून गट्टा (जां.), गर्देवाडा, हिदूर, हिकेर, तोरगट्टा, झारेवाडा , मोहंदी, हुडंसूर येथील जनतेला एटापल्ली तालुका मुख्यालयी ये-जा करणे जिकरचे झाले होते. ही बाब लक्षात घेऊन गट्टाचे पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुधीर पाडोळे यांनी पंचक्रोशीत नागरिकांची बैठक घेऊन गट्टा पोलिस अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरिकांनी लोकसहभागातून र्शमदान करून सदर मार्गाची दुरुस्ती केली.
पोलिसांच्या या पुढाकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस दलाच्या या कार्याचे सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे. याबाबत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलिस मदत केंद्र गट्टाच्या अधिकारी, कर्मचारी तसेच पंचक्रोशीत नागरिकांचे अभिनंदन केले आहे.




