27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ ९ लाख ९0 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क-जिल्हाधिकारी गिते

९ लाख ९0 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क-जिल्हाधिकारी गिते

0
36

भंडारा,दि.22ः-केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील तिनही विधानसभा क्षेत्रात एकूण ९ लाख ९0 हजार ६६५ मतदार आहेत. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या ४ लाख ९८ हजार ८२४ तर महिला मतदारांची संख्या ४ लाख ९१ हजार ८४१ आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी वंदना सौरंगपते, निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सर्वाधिक मतदार भंडारा विधानसभेत ३ लाख ७0 हजार ६९0 आहे. तुमसर विधानसभेत ३ लाख १ हजार ७३0 तर साकोली मतदारसंघात ३ लाख १८ हजार २४५ मतदार आहेत. सेनादलातील मतदारांची संख्या १६४२ तर अपंग मतदारांची संख्या ४ हजार ७४४ इतकी असून अपंग मतदारांसाठी मतदान केंद्रावर सर्व सोयीसुविधा उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
या निवडणुकीसाठी तुमसर येथे ३५६, भंडारा येथे ४५६, तर साकोली येथे ३९४ असे एकूण १ हजार २0६ मतदान केंद्र आणि तेवढेच बुथ लेवल अधिकारी असणार आहेत. १२३ क्षेत्रीय अधिकारी, १८ मोडल अधिकारी राहणार असून १४ फिरते व १४ बैठे पथक राहणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पुरेशा प्रमाणात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. २ हजार २५0 बीयु, १५५४ सीयु व १६५१ व्हीव्हीपॅट जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. मनुष्यबळही पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून मतदान केंद्राध्यक्ष १ हजार ५0८, प्रथम मतदान अधिकारी १ हजार ५0८, इतर मतदान अधिकारी ३ हजार १५ असे एकूण ६ हजार ३0 मनुष्यबळाची उपलब्धता आहे. मतदान प्रक्रि या सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस दल, सीआरपीएफ, होमगार्ड व अतिरिक्त पोलिसांची कुमत तैनात करण्यात येणार आहे. तिनही मतदार संघात एकूण ७ सखी मतदान केंद्र व आदर्श मतदान केंद्र असणार आहेत. आदर्श मतदान केंद्र सुशोभित राहणार असून मतदारांचे स्वागत करण्यासाठी रांगोळी घातली जाणार आहे. तसेच वयोवृद्ध मतदारांचे फुल देऊन स्वागत केले जाणार आहे. तुमसर येथे ३, भंडारा येथे ९ व साकोली येथे ७ असे १९ मतदान केंद्र क्रि टीकल मतदान केंद्र असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. गिते यांनी दिली.

राजकीय पक्षांना आचार संहितेचे पालन करतांना, मतदारांना पैशाचे किंवा वस्तुंचे आमिष दाखविणे, वेगवेगळया जाती, समूह व गटात मतभेद वाढतील, असे कृत्य करण्यावर मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणे, मंदिर, मस्जिद, चर्च, प्रार्थनास्थळे या ठिकाणी प्रचाराचे भाषण करण्यास बंधन घालण्यात आले असून भिंतीपत्रके, पोस्टर्स, बॅनर व अन्य प्रचाराचे साहित्य लावण्यास मनाई करण्यात आली आहे.