
Ø ग्रामस्तरावर स्विप कार्यक्रमाची व्यापक जनजागृती
भंडारा,दि. 25 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीदरम्यान नागरिकांनी जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला बळकट करावे, मतदानाचे महत्व कळावे आणि मतदानाचे जास्तीत जास्त टक्केवारी वाढावी यासाठी स्विप कार्यक्रमांतर्गत तुमसर, भंडारा आणि साकोली विधानसभा क्षेत्रात संकल्प पत्राचे वितरण करणे, विविध स्पर्धांचे आयोजन, पथनाटयाचे आयोजन तसेच ईव्हिएम- व्हीव्हीपॅटबाबत नागरिकांना प्रात्यक्षिकाद्वारे व्यापक प्रमाणात जनजागृती येत आहे.
स्विप कार्यक्रमांतर्गत विधानसभा निवडणूकीत नागरिकांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदानाचे महत्व कळावे, मतदानापासून कुणीही वंचित राहू नये आणि मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी याकरीता जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या निर्देशानुसार तुमसर, भंडारा आणि साकोली क्षेत्रात स्विप कार्यक्रमांतर्गत जनजागृतीचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. शालेय स्तरावर प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांच्या सहाय्याने पालकांना संकल्प पत्राचे वितरण करुन लोकशाही बळकट करण्याकरीता मतदान करण्याची गरज आहे, असे आवाहन करण्यात येत आहे.
निबंध, रांगोळी व वक्तृत्व स्पर्धा शालेय स्तरावर आयोजित करुन यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यात येत आहे. मतदान प्रक्रिया, आवश्यकता याबाबत महत्व सांगितल्या जात आहे. तीनही क्षेत्रामधून ग्रामस्तरावर ईव्हिएम व व्हीव्हीपॅटबाबत नागरिकांना प्रात्यक्षिकाद्वारे मतदान प्रक्रिया समजावून सांगितले जात आहे. लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपला मतदानाला असलेले महत्व पटवून दिले जात आहे. ग्रामस्तरावर घेण्यात येत असलेल्या प्रात्यक्षिकाच्या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फृर्त प्रतिसाद मिळत आहे. तालुकास्तरावरही अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करुन नागरिक मतदानापासून वंचित राहू नये या करिता प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. दिव्यांग मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे या करीता त्यांना निवडणूक आयोगाच्या वतीने उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची माहिती जनजागृतीच्या कार्यक्रमातून दिली जात आहे.
तरुण, युवक व पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांनाही जनजागृती कार्यक्रमातून प्रोत्साहित करण्यात येत आहे. ग्रामस्तराबरोबरच नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रातही मतदारांना जागरुक करण्याकरीता विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. भंडारा येथे लालबहादूर शास्त्री विद्यालयात जनजागृती व प्रशिक्षण देण्यात आले तर नगर परिषद पवनी येथे नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देणाऱ्या 600 संकल्प पत्राचे वाटप करण्यात आले. तीनही विधानसभा क्षेत्रातील कुडेगाव, नेरला, सौंदड, पिडकेपार, संगम पू., बेलगाव कवडशी, घोडेवाही, रेंगेपार, कवलेवाडा, सितेपार, सोमलवाडा व अन्य 100 गावांमध्ये ईव्हिएम व व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक व अन्य विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.
शाळा, महाविद्यालय व मतदान केंद्राच्या ठिकाणी जनजागृती
भंडारा विधानसभा क्षेत्रांतर्गत असलेल्या भंडारा व पवनी तालुक्यातील शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत व सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी स्विप अंतर्गत मतदार, नागरिकांचा लोकशाही प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी करुन घेण्याकरीता जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पालकांनी संकल्प पत्राची वाटप, ईव्हिएम व व्हिव्हीपॅटचे प्रात्यक्षिक, दिव्यांगाकरीता कार्यशाळा, पथ नाटयातून जनजागृती, स्लोगन स्पर्धा,नैतिक मतदान कार्यशाळा, वॉक फॉर वोट, मॅराथान, मतदान पावती वाटप आदि उपक्रम राबवून मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली.




