
- कारंजा येथील निवडणूक खर्च कक्षाला भेट
वाशिम, दि. २९ : निवडणूक खर्च संनियंत्रणासाठी विविध पथकांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक उमेदवाराच्या निवडणूक खर्चावर काळजीपूर्वक लक्ष ठेवावे. तसेच या खर्चाची नोंद त्यांच्या शॅडो रजिस्टरमध्ये करावी, अशा सूचना निवडणूक खर्च निरीक्षक नरेंदर सिंग यांनी आज दिल्या. कारंजा विधानसभा मतदारसंघासाठी कारंजा उपकोषागार कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षाला भेट देवून तेथील अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.यावेळी कारंजा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनुप खांडे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार धीरज मांजरे, जिल्हा कोषागार अधिकारी तथा निवडणूक खर्च संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी चंद्रकांत खारोडे, निवडणूक खर्च निरीक्षक श्री. सिंग यांचे संपर्क अधिकारी संतोष कंदेवार यांची उपस्थिती होती.
यावेळी श्री. सिंग म्हणाले, विधानसभा निवडणुकीत कोणत्याही उमेदवारांकडून मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दाखविले जावू नये, यासाठी सर्व फिरत्या पथकांनी सतर्क रहावे. स्टार प्रचारकांच्या सभा, रॅलीमध्ये उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चाची व्यवस्थित नोंद होण्यासाठी व्हिडीओ संनियंत्रण पथकांनी विशेष काळजी घ्यावी. सभा, रॅलीमधील प्रत्येक वस्तू, वाहनाचे रेकॉर्डिंग कॅमेरामध्ये करावे. लेखांकन पथकाने उमेदवाराचा खर्च काळजीपूर्वक शॅडो रजिस्टरमध्ये नोंदविला जाईल, याची दक्षता घ्यावी. तसेच सर्व पथकांनी विहित कालावधीत व विहित नमुन्यात नियमितपणे आपले अहवाल सादर करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच येथील अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांना उत्तरे दिली.
तऱ्हाळा तपासणी नाक्याला भेट
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नागपूर ते औरंगाबाद महामार्गावर तऱ्हाळा (ता. मंगरूळपीर) येथे उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्याला निवडणूक खर्च निरीक्षक नरेंदर सिंग यांनी भेट दिली. याठिकाणी नेमणूक करण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाकडून करण्यात येत असलेल्या वाहन तपासणीबाबतची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली. तसेच संबंधितांना सदैव सतर्क राहून वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.



