
मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत केला भाजप प्रवेश
नागपूर, दि.३० – गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते व गोंदिया विधानसभा मतदारसंघातील सलग तीनदा आमदार राहिलेले गोपालदास अग्रवाल यांनी आज सोमवारला (दि.३०) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.अग्रवालांच्या प्रवेशप्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की जेव्हा आमची सत्ता आली तेव्हा आम्ही शिवसेनेच्या भुमिकेमुळे अल्पमतात आलो होतो.त्यावेळी सर्वात आधी मदतीला गोपालदास अग्रवाल धावून आले आणि माझा राजीनामा घ्या.सोबत 2-3 आमदारांचा राजीनामा वाटल्यास मी आणून देतो परंतु मुख्यमंत्री हा आपल्या विदर्भाचाच राहिला पाहिजे असे सांगत विरोधी पक्षाचे आमदार असतानाही आम्हाला संपुर्ण सहकार्य केले.विशेष म्हणजे अग्रवालांच्या पक्ष प्रवेशासाठी युतीची मुंबईतील घोषणा सोडून मुख्यमंत्री नागपूरात आले होते.आमदार अग्रवालांनीही सरकारने व मुख्यमंत्र्यानी सहकार्य केल्याची ग्वाही दिली.मुख्यमंत्र्याी दुपट्टा घालून अग्रवालांचा पक्षात प्रवेश केला.
आ.अग्रवालांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम येथील रामदासपेठ स्थित होटल सेंटर पाँईट येथे पार पडला. यावेळी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे,गोंदिया जिल्हा भाजप अध्यक्ष हेमंत पटले,तिरोड्याचे आमदार विजय रहागंडाले,नागपूरचे आमदार देशमुख,माजी आमदार खोमेश रहांगडाले,विरेंद्र अजंनकर,आ.अग्रवाल यांच्या पत्नी उमादेवी अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
गोंदियातून ४०० ते ५०० कार्यकर्त्यांसह आमदार अग्रवाल दुपारी गोंदियावरून भाजप प्रवेशासाठी रवाना झाले होते. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सीमा मडावी, माजी महिला बालकल्याण सभापती विमल नागपुरे, नगर परिषदेचे बांधकाम सभापती शकील मंसुरी यांच्यासह अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी नागपूर येथे अग्रवालांच्या भाजप प्रवेशाच्यावेळी उपस्थित होते.आमदार अग्रवाल यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे संचालन भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी केले.




