
भंडारा,दि. 1 :- महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छता ही सेवा हे विशेष अभियान राबविण्यात येत असून उद्या 2 ऑक्टोबर रोजी प्लास्टिक कचरा निर्मुलनासाठी जिल्हयात महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाश्रमदानाच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.
संपूर्ण देशभरात स्वच्छता ही सेवा या विशेष अभियानाची अंमलबजावणी जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने 11 सप्टेंबर ते 27 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात येत आहे. हे अभियान दोन टप्प्यात राबविण्यात येत असून 11 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत व्यापक जनजागृती तर 2 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या कालावधीत प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करुन सुरक्षित विल्हेवाट लावायची आहे. तसेच 2 ऑक्टोबरला प्लास्टिक कचरा निर्मुलनासाठी महाश्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 11 सप्टेंबरला भंडारा जिल्हयात स्वच्छता ही सेवा या विशेष अभियानाचा शुभारंभ झालेला असून शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी व विविध शासकीय कार्यालय व ग्रामस्तरावर माहिती शिक्षण संवादाचे विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे. 2 ऑक्टोबरला जिल्हा परिषदच्या सभागृहात महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच भंडारा येथे प्रगती महाविद्यालय, जे.एम. पटेल महाविद्यालय, आठवले समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने जिल्हा परिषद, शासकीय कार्यालय व परिसर तसेच गणेशपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत प्लास्टिकमुक्तीसाठी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचायत समिती, ग्रामपंचायत, महाविद्यालय, शाळा, विविध शासकीय कार्यालयातही हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. जिल्हयातील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वेगवेगळया गावात श्रमदानासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. स्वच्छता ही सेवा या विशेष अभियानात अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी सहभागी होऊन प्लास्टिक कचऱ्यांचे संकलन करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले आहे.




