30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी जनजागृतीसाठी;राजस्थान आर्य महाविद्यालयात झाले अभिरूप मतदान

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी जनजागृतीसाठी;राजस्थान आर्य महाविद्यालयात झाले अभिरूप मतदान

0
14
  • जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांची उपस्थिती
  •  ‘स्वीप’ अंतर्गत उपक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग
  • फिरत्या अभिरूप मतदान केंद्राद्वारे पार पडले मतदान
  • नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजाविण्याचे आवाहन

वाशिम, दि. ०2 : वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून पहिल्यांदाच मतदान प्रक्रियेला सामोरे जात असलेल्या नवमतदारांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या कार्यपद्धतीविषयी माहिती व्हावी, याकरिता जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत राजस्थान आर्य महाविद्यालयात आज अभिरूप मतदान (मॉक पोल) घेण्यात आला. फिरत्या अभिरूप मतदान केंद्रामध्ये हे मतदान पार पडले. ‘स्वीप’ अंतर्गत आयोजित या उपक्रमाला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी उपस्थित राहून नवमतदारांनी येणाऱ्या २१ ऑक्टोंबर रोजी अवश्य मतदान करावे, असे आवाहन केले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व ‘स्वीप’चे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली  आयोजित या उपक्रमाला राजस्थान आर्य महाविद्यालयाचे प्राचार्य मीनलकुमार संचेती, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा ‘स्वीप’चे सहाय्यक नोडल अधिकारी सुभाष राठोड, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट जनजागृती पथकातील वैजनाथ बनसोड, आर. जी. गरपाल, पी.आर. वैद्य, ए. एन. कुकडकर, सर्जेराव नरवटे, राजू बोरकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांपैकी २५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या अभिरूप निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेवून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या कार्यपद्धतीविषयी माहिती जाणून घेतली.