- दिव्यांगांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा
- प्रत्येक दिव्यांग मतदारापर्यंत पोहोचून माहिती संकलन करा
वाशिम, दि. ०३ : मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग मतदारांपर्यंत पोहोचून त्यांची माहिती संकलित करा. तसेच या मतदारांचे २१ ऑक्टोंबर रोजी १०० टक्के मतदान होईल, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त प्रा. संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, उपजिल्हाधिकारी (महसूल) रमेश काळे, उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी राजेंद्र जाधव, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक कालिदास तापी, जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अतुल कानडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी अनंत मुसळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. सिंह म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग मतदारापर्यंत पोहोचून त्यांची प्राथमिक माहिती संकलित करावी. यामध्ये त्यांना कोणत्या प्रकारचे दिव्यंगत्व आहे याबाबतचा तपशील खात्री करून घेवून मतदानादिवशी त्यांना कोणकोणत्या सुविधा पुरविणे आवश्यक आहे, याबाबत मतदान केंद्रनिहाय नियोजन करावे. त्यानुसार घरापासून मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी स्वयंसेवक, मतदान केंद्रांवर सहाय्यक तसेच जिल्ह्यातील रिक्षाचालक संघटना यांच्या सहकार्याने मोफत वाहतूक सुविधा पुरविण्यात यावी. दिव्यांग मतदारांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांसाठी ग्रामपंचायत अथवा नगरपरिषदेचे आवश्यक सहकार्य घेण्यात यावे.
ज्या दिव्यांग मतदाराच्या दिव्यंगत्वाचा तपशील मतदार यादीत नोंदविलेला नाही, अशा मतदारांची माहिती संकलित करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावेत. जेणेकरून विधानसभा निवडणुकीकरिता होत असलेल्या मतदानादिवशी प्रत्येक दिव्यांग मतदारांपर्यंत त्यांच्या आवश्यकतेनुसार सुविधा पोहचविणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले. सर्व मतदान केंद्रांवरील रँप सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअर व स्वयंसेवक उपलब्ध ठेवावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार ५२५ दिव्यांग मतदारांची नोंद झालेली असून त्यापैकी ४ हजार ६८९ दिव्यांग मतदारांची आतापर्यंत आशा कर्मचारी व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेवून त्यांची आवश्यक संकलित केली आहे. आशा कर्मचारी यांनी केलेला सर्वे व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे असलेल्या दिव्यांग बांधवांच्या नोंदींची मतदार यादीशी पडताळणी करून मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट असलेल्या, मात्र दिव्यांग म्हणून नोंद नसलेल्या दिव्यांग मतदारांची यादी तयार करण्यात येत असून मतदानापूर्वी या सर्व दिव्यांग मतदारांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नेमण्यात आलेली विविध पथके, संनियंत्रण कक्ष, समित्या यांच्या कामकाजाचाही विभागीय आयुक्त श्री. पीयूष सिंह यांनी आढावा घेतला.




