गोंदिया,दि.05 : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दि.४) जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण ७६ उमेदवारांनी ११२ अर्ज दाखल केले. त्यामुळे सध्यातरी निवडणुकीच्या रिंगणात ७६ उमेदवार आहेत. मात्र सोमवारपर्यंत (दि.७) उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असल्याने सोमवारीच निवडणुकीच्या रिंगणातील लढवय्यांचा खरा आकडा स्पष्ट होणार आहे. गुरूवारपर्यंत (दि.३) जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांसाठी २७ उमेदवारांनी ३३ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातच शुक्रवार (दि.४) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने बम्पर भर्ती दिसून आली. शुक्रवारी जिह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांसाठी ७६ उमेदवारांनी ११२ अर्ज दाखल केले.विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी बघितल्यास, (६३) अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातून २१ उमेदवारांनी ३२ उमेदवारी अर्ज, (६४) तिरोडा विधानसभा मतदारसंघातून १८ उमेदवारांनी २२ उमेदवारी अर्ज, (६५) गोंदिया विधानसभा मतदारसंघातून २७ उमेदवारांनी ४३ उमेदवारी अर्ज तर (६६) आमगाव विधानसभा मतदारसंघातून १० उमेदवारांनी १५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.विशेष म्हणजे, जिल्ह्यातील राजकारणाचा गड असलेल्या गोंदिया विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक २७ उमेदवारांनी ४३ अर्ज दाखल केले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार हा अखेरचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या जिल्ह्यातील दिग्गज उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करुन नामाकंन दाखल केले. या वेळी उमेदवारांसह त्या पक्षाचे वरिष्ठ नेते सुध्दा उपस्थित होते. शुक्रवार हा नामाकंन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उपविभागीय कार्यालय परिसराला गर्दीचे स्वरुप आले होते.शुक्रवारी गोंदिया मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी भाजप जिल्ह्याध्यक्ष हेमंत पटले,नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आ. रमेश कुथे, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे,सुनिल केलनका,माजी आमदार केशव मानकर,भैरसिंह नागपूरे,जि.प.अध्यक्ष सीमा मडावी,जि.प.उपाध्यक्ष हामिद अल्ताप,शैलजा सोनवाने,नंदूभाऊ बिसेन,राजेश चतूर,दिपक कदम,प्रकाश रहमतकर,राकेश ठाकूर,डाॅ.राधेश्याम अग्रवाल,मधु अग्रवाल यांच्या उपस्थितीत सर्कस मैदान येथून रॅली काढून नामाकंन दाखल केले.आमदार अग्रवालांसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची झाली असून भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी त्यांच्यासोबत काम करायला तयार दिसून येत नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.पक्षाच्या आदेशावरही कार्यकर्ते पाहिजे तसे त्यांच्या नामांकन रॅलीसाठी हजर झाले नसल्याची चर्चा असल्याने भाजपचे मतदार गोपालदास अग्रवालांना साथ देतात की काय करतात याकडेही नजरा लागल्या आहे.
या उमेदवारांसह अन्य पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी नामाकंन दाखल केले.नामाकंन दाखल करण्यासाठी सर्व पक्षाच्या दिग्गज उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.त्यामुळे उपविभागीय कार्यालय परिसराला जत्रेचे स्वरुप आले होते.प्रचाराला येणार सोमवारपासून रंगतविधानसभा निवडणुकीसाठी नामाकंन दाखल करण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. तर सोमवारी नामाकंन वापस घेण्याचा शेवटचा दिवस आहे.त्यामुळे सोमवारनंतरच जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रातील अंतीम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. यानंतरच निवडणूक प्रचाराला खरी रंगत येणार आहे.सर्वच पक्षात बंडखोरीयंदा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षात इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे उमेदवारी जाहीर करतांना शेवटच्या दिवसांपर्यंत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चांगलीच दमछाक झाली.
गोंदिया विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी बंडखोरी करित अपक्ष म्हणून नामाकंन दाखल केले.अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून काँग्रेसमधून बंडखोरी करित राजेश नंदागवळी, रत्नदीप दहीवले,आनंद जांभुळकर यांनी तर भाजपमधून अपक्ष म्हणून पोमेश रामटेके यांनी नामाकंन दाखल केले.तर आमगाव मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आ.रामरतन, नामदेव किरसान यांनी अपक्ष म्हणून शुक्रवारी नामाकंन दाखल केले.त्यामुळे सर्वच पक्षात बंडखोरी असल्याचे चित्र आहे. नामाकंन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे माजी खा.खुशाल बोपचे आणि त्यांचे पुत्र गुड्डू बोपचे यांनी गुरूवारी रात्री उशीरा खा.प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसेने गुड्डू बोपचे यांना तिरोडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. दरम्यान खुशाल बोपचे यांचा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला प्रवेश भाजपला धक्का मानला जात आहे.आता लक्ष बंडोबांना शांत करण्याकडेसर्व पक्षाच्या उमेदवारांनी अपक्ष म्हणून नामाकंन दाखल केले आहे.त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते बंडोबाना शांत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.त्यामुळे यात त्यांना कितपत यश येते हे ७ ऑक्टोबरलाच कळेलच. बंडोबा शांत न झाल्यास पक्षाला याचा फटका बसू शकतो.





