33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ भाजपच्या राज्यात शेतकरी व व्यापारीही निराश

भाजपच्या राज्यात शेतकरी व व्यापारीही निराश

0
19

blank

गोपालदास अग्रवाल : जिल्हा कॉंग्रेस कमिटीची सभा
गोंदिया : केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या शासनापासून समाजातील प्रत्येकच वर्ग निराश झाला आहे. अतवृष्टी व गारपिटीनंतरही शासन शेतकर्‍यांना मदत देताना दिसत नाही. व्यापारातही आर्थिक मंदी असून व्यापारी त्रस्त आहेत. सत्तेत आल्यावर धानावरील बोनस शासनाने बंद केले. पेट्रोल-डिजेलचे दर कमी असतानाही जास्त दरात विकून नागरिकांना लुटले, रेल्वे भाड्यात वाढ करून सर्व वस्तू महाग केल्या. तर आता भूसंपादन कायद्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांची जमीन हिसकाविण्यावर तुटून पडले असून भाजपच्या शासनकाळात शेतकरी व व्यापारीही निराश असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसदर्भात आयोजित जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते.
पुढे बोलताना त्यांनी, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची नियुक्ती झाल्याने एक नवी उर्जा व विश्‍वास पक्ष कार्यकर्त्यांत आला आहे. तर भाजप शासनाच्या शेतकरी व व्यापारी विरोधी धोरणांना मतदात्यांपर्यंत पोहचवून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीत नागरिकांचे सहकार्य मागण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.
तर जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांनी, मागील पाच वर्षांत जिल्हा परिषदेत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचाराचे वातावरण असून जिल्ह्याचे विकास कार्य कित्येक वर्ष मागे गेले आहेत. भाजपच्या पाच वर्षातील या अराजक कार्यकाळालाही आम्हाला जनते समक्ष आणण्याचे मत व्यक्त केले.
बैठकीला जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष प्रफुल अग्रवाल, दिलीप डोये, माजी जिल्हा परिषद सदस्य पी.जी.कटरे, माजी बाजार समिती सभापती धनंजय तुरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनी नागपुरे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन, अजीत जैन, अनिल गौतम, शहर अध्यक्ष अशोक चौधरी, सेवादल जिल्हाध्यक्ष पन्नालाल शहारे, महिला जिल्हाध्यक्ष उषा मेंढे, महासचिव अमर वराडे, धन्नालाल नागरिकर, महिल शहरअध्यक्ष अँड. निलू मांढरे, जिल्हा परिषद सदस्य रमेश लिल्हारे, रूद्रसेन खांडेकर, अर्जुनी नागपुरे, मीना सोयाम, मुनेंद्र नांदगाये, माजी पंचायत समिती सभापती सरिता अंबुले, पंचायत समिती सभापती शोभेलाल पारधी, मनीष मेश्राम, पंचायत समिती सभापती कौशल्या बोपचे, लोकचंद दंदरेसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

blank