27.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ निवडणूक कालावधीकरीता प्रतिबंधात्मक आदेश

निवडणूक कालावधीकरीता प्रतिबंधात्मक आदेश

0
47

वाशिम, दि. ०९ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ चा कार्यक्रम घोषित झाला असुन आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत निवडणूक कालावधी करीता जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागु केले आहेत.

जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था आणि विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा तांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे, सदरील आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणुकी संबंधाने पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट, कटआऊट, पेंटींग्ज, होर्डींग्ज लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्ये लिहिणे किंवा सदर आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणुकीच्या कामात बाधा निर्माण होईल, अशी कृती करणे इत्यादी बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

निवडणूक कालावधीत शासकीय, निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपीकरण करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने, मुद्रणालयाच्या मालकाने व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकांनी मतपत्रिका नमुना छापताना इतर उमेदवारांचे नाव व त्यांना नेमून देण्यात आलेली चिन्हे वापरणे, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्या प्रमाणे कागद वापरणे, आयोगाने निचित केलेल्या कागदपत्राच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे आदी बाबींवर निर्बंध राहतील. राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांने निवडणुकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भिंतीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे इत्यादी कोणत्याही व्यक्तीच्या जागा, इमारत, आवार भिंत इत्यादीवर संबंधित मालकाच्या परवानगीशिवाय व संबंधित परवाना प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वापर करण्यास निर्बंध घालण्यात येत आहेत.

राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांने पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट, कटआऊट, पेंटींग्ज, होर्डींग्ज लावणे व इतर बाबींमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवू शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे निवडणुकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल, अशा पद्धतीने लावण्यास निर्बंध घालण्यात येत आहेत. निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी वाहनांवर ध्वनिक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदूषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थास बाधा पोहोचण्याची व उशिरा रात्रीपर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा चालू ठेवण्याची शक्यता असल्याने सदर बाबींवर निर्बंध घालण्यात येत आहेत.

निवडणूक प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचेकडून निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे इत्यादी बाबींसाठी निर्बंध घालण्यात येत आहेत. कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्या मोटारगाड्या, वाहने यांच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक वाहने नसावीत, असे निवडणूक आयोगाचे निर्देश असल्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहा पेक्षा अधिक मोटार गाड्या, वाहनांच्या ताफ्यात वापर करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. जिल्ह्यात कसल्याही राजकीय प्रकारचे जात, भाषा, धार्मिक शिबिरांचे, मेळाव्यांचे आयोजनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. धार्मिक स्थळ, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

ज्या ठिकाणी मतदान होणार आहे, त्या मतदान केंद्राच्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरात सर्व पक्षकारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपक, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामा व्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधित पक्षांच्या चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूक कामा व्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. निवडणूक साहित्य कक्ष (स्ट्रॉंग रूम), तसेच जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर २०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहील. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाणे धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध घालण्यात येत आहेत.

लोकप्रतिनिधी कायदा १९५१ चे कलम १२६ मधील तरतुदीनुसार कोणतीही व्यक्ती कोणत्याही मतदान क्षेत्रात, त्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही निवडणुकीतील मतदान पूर्ण करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेपर्यंत पूर्ण होणाऱ्या ४८ तासांच्या कालावधीत निवडणुकीच्या संबंधात कोणतीही जाहीर सभा किंवा मिरवणूक बोलावारणार नाही, भरवणार नाही, त्यास उपस्थित राहणार नाही, त्यात सहभागी होणार नाही किंवा त्यास उद्देशून अभिभाषण करणार नाही. जनतेला चलचित्राच्या, दूरचित्रवाणीच्या किंवा अन्य तत्सम साधनांच्या सहाय्याने निवडणूक विषयक कोणतीही बाब प्रदर्शित करणार नाही. जनतेचे लक्ष आकर्षून घेण्यासाठी कोणतीही संगीत सभा किंवा अन्य नाट्यप्रयोग किंवा कोणताही करमणुकीचा वा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करून किंवा आयोजित करण्याची व्यवस्था करून निवडणूक विषयक कोणत्याही बाबींचा प्रचार करणार नाही, असे आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.