- पत्र लिहून केले २१ ऑक्टोंबरला मतदान करण्याचे आवाहन
- ‘स्वीप’ अंतर्गत जिल्ह्यातील १३८५ शाळांमध्ये उपक्रम
वाशिम, दि. ०९ : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’ उपक्रमाचे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पालकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती व्हावी, यासाठी आज जिल्ह्यातील १ हजार ३८५ प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सुमारे २ लाख विद्यार्थ्यांनी पालकांना पत्र लिहून मतदानाचे महत्व पटवून सांगितले. तसेच २१ ऑक्टोंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानावेळी अवश्य मतदान करावे, असे आवाहनही या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्रातून केले आहे.
‘स्वीप’ अंतर्गत विविध कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. मतदान जागृतीची शपथ, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध व घोषवाक्य लेखन स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेवून मतदान जागृतीचा संदेश पालक व इतर मतदारांपर्यंत पोहोचविला आहे. आज झालेल्या पत्रलेखन स्पर्धेतही जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सुमारे २ लाख विद्यार्थी सहभागी झाले होते, असे शिक्षण विभागाने कळविले आहे.
यावेळी त्यांनी मतदानाचा हक्क आणि त्याचे महत्व विषद करणारे पत्र आपल्या पालकांना लिहिले. तसेच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करणे कसे आवश्यक आहे, हे सांगून २१ ऑक्टोंबरला मतदान करण्याचे आवाहनही या पत्राद्वारे केले आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यामिक) तानाजी नरळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनी प्रयत्न केले.




