गडचिरोली,दि.10: विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या चातगाव दलमच्या कमांडरसह ७ नक्षल्यांनी आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसपर्मण केले. त्यांच्यावर सुमारे ३३ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस होते.माओवादी हे अल्पवयीन आदिवासी मुलींना पळवून नेऊन बळजबरीने त्यांना दलममध्ये भरती करीत होते, तसेच विकास कामात आडकाठी निर्माण करणे, या बाबींना कंटाळून ७ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोहीत गर्ग, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल उपस्थित होते.
राकेश उर्फ गणेश सनकू आचला (३४), देविदास उर्फ मनिराम सोनू आचला, रेश्मा उर्फ जाई दुलसू कोवाची (१९), अखिला उर्फ राधे झुरे (२७),शिवा विज्या पोटावी (२२),करूणा उर्फ कुम्मे रामसिंग मडावी (२२) व राहूल उर्फ दामजी सोमजी पल्लो (२५) अशी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांची नावे आहेत. यातील राकेश आचला हा चातगाव दलमचा कमांडर तर देविदास आचला हा उपकमांडर होता. आत्मसमर्पण करणाऱ्यांवर चकमक, खून व जाळपोळीचे अनेक गुन्हे दाखल होते.
गडचिरोली पोलिस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे २०१९ मध्ये आजपर्यंत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासमोर एकूण २३ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यात ३ डिव्हीसी, १ दलम कमांडर, १ दलम उपकमांडर, १७ सदस्य, १ जनमिलीशिया यांचा समावेश आहे. तर २१ मावाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये डी.के.एस.झेड.सी. मेंबर २, दलम कमांडर १, सदस्य ३, पार्टी मेंबर २, समर्थक १३ यांचा समावेश आहे.
नक्षल चळवळीला आता लोकांची साथ मिळत नाही. नक्षलवाद्यांची उपासमार होते. पोलिसांचे अभियानही वाढले आहे. त्यामुळे सतत जीवाची भीती असते. नक्षल चळवळीत राहण्यापेक्षा आत्मसमर्पण करणाऱ्यांचे जीवन सुखी आहे हे लक्षात आले. नक्षलवाद्यांकडून लग्न करण्याचीही परवानगी नसते. आता आम्ही सुखाने राहू, अशी भावना आत्मसमर्पित नक्षल कमांडर राकेश उर्फ गणेश सनकू आचला याने पत्रकारांपुढे व्यक्त केली.





