30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home राजकीय नगर पंचायतीचे सफाईकामगार जुंपले प्रचाराला

नगर पंचायतीचे सफाईकामगार जुंपले प्रचाराला

0
40

आमदार संजय पुराम यांचा प्रताप

गोंदिया,दि.14 – आमगाव विधानसभा मतदार संघाचा आमदार मीच, मला चॅलेंज नाही. मी या क्षेत्राचा विकासपुरुष आहे, असा छातीठोक दावा करणारे भाजपचे उमेदवार संजय पुराम यांचेवर देवरी नगर पंचायतीच्या सफाई कामगारांना आपल्या प्रचार कार्याला लावण्याची नामुष्की ओढवली आहे. निमशासकीय संस्थांच्या लहान कामगारांना अशा पद्धतीने राबवीत असल्याने त्यांनी कदाचित या निवडणुकीचा धसका तर घेतला नसावा ना? अशी कोपरखळी या निवडणुकीच्या निमित्ताने आमगाव देवरी मतदार संघात ऐकावयास मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे तक्रार करण्यात आल्याचे वृत्त आहे.
66- आमगाव विधानसभा मतदार संघात येत्या 21 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात असलेले नऊही उमेदवारांचा दुसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोचला आहे. सर्वच उमेदवार आपल्या विजयाचा दावा करीत असले तरी भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार संजय पुराम आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार सहसराम कोरेटी यांच्यात दुहेरी लढतीचे चित्र आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार रामरतन राऊत यावेळी मतदारांना प्रभावित करण्यात फारसे यशस्वी होताना दिसत नाही. यामुळे राऊत यांचेसह इतर उमेदवारांना मिळणारी मते ही भाजप आणि कॉग्रेसची समीकरणे मात्र फिरवू शकतात.
मतदारांना प्रभावित करण्यासाठी यावेळी रिंगणातील उमेदवार हायटेक अशा नाना क्लृप्त्या वापरताना दिसत आहेत. संगीताच्या तालावर डीजेचा कर्कश वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर निर्माण झाल्याने विद्यमान आमदारांच्या तोंडचे पाणी पळाल्याची चर्चा मतदार संघात आहे. यामुळे श्री. पुराम यांनी आपल्या प्रचारात एकही कसर न ठेवण्याचा विडा उचलल्याचे दिसते. यासाठी देवरी नगर पंचायतीच्या कंत्राटदाराची माणसे आपल्या पक्षाचे टी-शर्ट आणि टोप्या देऊन कामाला लावल्याचा आरोप आहे. हे कर्मचारी सफाईकामगार असल्याने ते आपल्या कामाच्या वेळेत सत्ताधारी पक्षाचा प्रचार करणे योग्य नव्हे, असे विरोधकांना वाटत असल्याने एका इसमाने याविरुद्ध निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार केल्याची माहिती आहे. यासंबंधी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनी स्वीच्ड ऑफ येत होता.तर निर्वाचन अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
निमशासकीय संस्थाच्या कामगारांना अशा प्रकारे प्रचारकार्यात गुंतवणे म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे.