25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home राजकीय धान बोनसचा शब्द पाळा;अन्यथा जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन काँग्रेसचा सरकारला इशारा

धान बोनसचा शब्द पाळा;अन्यथा जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन काँग्रेसचा सरकारला इशारा

0
4

गोंदिया:“धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महायुती सरकारने दिलेला धान बोनसचा शब्द तात्काळ पाळावा; अन्यथा काँग्रेस गप्प बसणार नाही आणि संपूर्ण जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल,” असा रोखठोक इशारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्य सरकारला देण्यात आला आहे.शेतकरी व सर्वसामान्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (ता. ३१) महामहीम राज्यपाल यांच्या नावे उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले. या प्रसंगी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दुमदुमून सोडला अन् शासनाचा तीव्र निषेध नोंदवला.

‘फडणवीसांनी जाहीर सभेत दिलेला शब्द पाळा!’

निवेदनात काँग्रेसने नमूद केले आहे की, गोंदिया हा राज्यातील प्रमुख धान उत्पादक जिल्हा असून येथील बळीराजाला यापूर्वी दरवर्षी हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस दिला जात होता. सन २०२४ मध्ये गोंदिया येथील जाहीर सभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यास धान बोनसची रक्कम वाढवून देण्याची मोठी घोषणा केली होती. मात्र, सरकार स्थापन होऊन इतका काळ लोटला तरीही त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर प्रहार:“महायुतीचे जिल्ह्यात दोन राज्यसभा खासदार, दोन विधानपरिषद सदस्य आणि चार आमदार प्रतिनिधित्व करत आहेत! एवढी मोठी ताकद हातात असतानाही धान बोनसच्या प्रश्नावर हे लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प का? त्यांनी कसलाही अपेक्षित पाठपुरावा केलेला नाही,” असा थेट आणि आक्रमक आरोप काँग्रेसने निवेदनातून केला आहे.

काँग्रेसच्या ५ प्रमुख व कडक मागण्या:

१. धान बोनसची घोषणा: धान उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव बोनस तातडीने जाहीर करून दिलासा द्यावा.

२. खतांच्या किमतींवर वेसण: रासायनिक खतांच्या गगनाला भिडलेल्या वाढत्या किमतींवर शासनाने तात्काळ नियंत्रण आणावे.

३. बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस बियाण्यांच्या विक्रीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.

४. स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा: वीज वितरण विभागाकडून सर्वसामान्यांच्या घरी लादली जाणारी ‘स्मार्ट मीटर’ची सक्ती तातडीने रद्द करावी.

५. शेतकरी हित जपा: वाढता उत्पादन खर्च आणि शेतकरी-सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावेत.

काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची उपस्थीती!

या आक्रमक आंदोलनात जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अमर वराडे, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजीत वंजारी, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेत्या उषाताई मेंढे, जिल्हा परिषद सदस्या उषाताई सहारे, छबुताई उके, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा वंदनाताई काळे, किरणताई कांबळे, ॲड. दुष्यंत किरसाण, सालेकसा नगरपंचायतीचे अध्यक्ष विजय फुंडे, डेमेंद्र रहांगडाले, निकेश मिश्रा, मनीष मेश्राम, रंजीत गणवीर, जीवन शरणागत, ओम पटले, राजकुमार पटले, वाय. टी. कटरे, कुणाल शेंडे, कुलदीप गुप्ता, राजेश चांदेवार यांच्यासह काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.